पुसद ( यवतमाळ) : येथून जवळच असलेल्या वडसद तांडा येथील स्वत:च्या ट्रकवर चालक असलेल्या युवकाने विषारी तणनाशक प्राशन करुन जीवनयात्रा संपविल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
निलेश विजय जाधव (वय— ३२वर्ष) रा.वडसद तांडा ता.पुसद यांने शनिवारी( ता.१३) आपला आयशर ट्रक क्रं.एम एच.२९ बीई २६६७ मध्ये माल भरती करण्यासाठी शेलु येथे जात असल्याचे सांगून दुपारी दोन वाजता वाहनासह घरुन निघाला.पुसद येथे गेल्यानंतर त्याने एक लिटर विषारी तणनाशक घेतले व शेलू रोडवरील साई मंदीराजवळ ट्रक थांबवून एका झाडाखाली त्याने अर्धा लिटर तणनाशक प्राशन केले.
त्यानंतर त्याने आपल्या मित्राला भ्रमणध्वनीवरून फोन करून मी विष प्राशन करून जीवन यात्रा संपतवित असल्याचे सांगितले. ही बातमी कळताच त्याचे नातेवाईकांनी घटनास्थळ गाठून निलेश जाधवला पुसद येथील डॉ. राजेश चव्हाण यांचे खाजगी दवाखान्यात भरती केले. तब्येतीत सुधारणा होत नसल्याने रात्री अकरा वाजता त्याला लाईफ लाईन दवाखान्यात भरती केले.
दरम्यान हिपॅटायटिस टू तसेच किडनी निकामी झाल्याचे व प्राशन केलेले विष संपूर्ण शरीरात भिनल्याचे डाॅक्टरांनी नातेवाइकांना सांगितले.दरम्यान त्याची तब्बेत आणखीनच खालावली व त्याने उपचाराला प्रतिसाद न दिल्यामुळे अखेर रविवारी(ता.१४)त्याची प्राणज्योत मालवली. मृतदेहाचे उपजिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आले असून जिवनयात्रा संपविण्याचे कारण अद्याप कळू शकले नाही.
निलेश जाधवच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकूल वातावरणात वडसद तांडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी त्याची चिमुकली मुले,पत्नी व नातेवाईकांनी हबंरडा फोडून दु:ख व्यक्त करुन त्याला अखेरचा निरोप दिला. मृत्युपश्चात वडील,आई, पत्नी, दोन मुले, एक भाऊ, तीन विवाहित बहिणी असा बराच मोठा परिवार आहे.