यवतमाळ : मेडिकल परिसरात अवैध धंदे फोफावले आहे. या ठिकाणी दिवसरात्र दारू विक्री सुरू असते. या व्यवसायावर आपले वर्चस्व कायम रहावे यासाठीच लल्ला खाटिक ऊर्फ पंकज अशोकराव कराळे (३३) याला सोमवारी सायंकाळी संपविण्यात आले. सनकी, देवा, गुड्डू, बिट्ट्या यांनी एकत्र येऊन लल्लाचा पद्धतशीरपणे गेम केला. लल्ला हा पाेलिसांचा खबरी आहे, असा संशय आरोपींना होता. या कारणानेही लल्लाला संपविण्यासाठी सर्वांचे संगनमत झाले.
वाघापूर नाका ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरचा परिसर येथे राजरोसपणे अवैध दारू विक्री, जुगार सुरू असतो. कधी तरी पोलिस कारवाई केली जाते. चिकन व्यावसायिक लल्ला ऊर्फ पंकज कराळे याचे पोलिसांसोबत चांगले संबंध होते. परिसरातील काही माहिती तो पुरवित होता. यामुळेच या भागात दारू विक्री करणारा देवा दुर्गाप्रसाद मिश्रा (४५), नीलेश दरवई (३०), रज्जत शर्मा (३०), बिट्या ऊर्फ सिद्धार्थ संजय वानखडे (२४), गुड्डु ऊर्फ यशवंत कांबळे (२५), विवेक ऊर्फ सनकी गौतम कांबळे (सर्व रा. बांगरनगर), अम्मू ऊर्फ अमोल नारनवरे (२५, रा. बाभुळगाव) यांनी कट रचला.
सोमवारी दुपारी ४ वाजता लल्ला याला दारूची पार्टी आहे, असे सांगून कृषी विज्ञान केंद्राच्या शेतात नेले. तेथे या सर्वांनी सोबत दारू घेतली. नंतर लल्लाचा चाकूने गळा चिरला. पोटावर, पाठीवर, मानेवर वार केले. यातच लल्लाचा जागीच मृत्यू झाला. यानंतर हे सर्वजण तेथून पसार झाले, अशी तक्रार लल्लाचा भाऊ प्रमोद अशोक कराळे याने लोहारा पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यावरून आरोपीविरोधात कलम ३०२, १२० ब, १४३, १४४, १४७, १४८, १४९ भादंवि सहकलम १३५ महाराष्ट्र पाेलिस कायदा यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेची माहिती पीकेव्हीतील प्राध्यापकांनी लोहारा पोलिसांंना दिली. ठाणेदार दीपमाला भेंडे यांंनी घटनास्थळ गाठले.
श्वान पथकासह सायबर सेल घटनास्थळी
परिस्थितीजन्य पुरावे गोळा करण्यासाठी श्वान पथक, फिंगर प्रिंट युनिट व सायबर सेलच्या पथकाला पाचारण करण्यात आले. पोलिसांनी रात्रीच आरोपींची धरपकड सुरू केली. शहर ठाण्यातील बीट मार्शल सुनील पैठणे याने सनकी ऊर्फ विवेक कांबळे याला ताब्यात घेतले, तर एलसीबीच्या टीमने गुड्डू ऊर्फ यशवंत कांबळे याला उचलले. त्यानंतर लोहारा पोलिस व एलसीबीच्या पथकाने रजत शर्मा, नीलेश दरवई, देवा मिश्रा यांना ताब्यात घेतले आहे, तर बिट्या ऊर्फ सिद्धार्थ वानखडे, अम्मू ऊर्फ अमोल नारनवरे हे दोघे पसार झाले आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहे.