यवतमाळ : लाडखेड पाेलिस ठाण्यातील माेझर येथे एका शेतातील विहिरीत युवकाचा मृतदेह आढळला. त्याच्या हातावरचा टॅटू व गाेंदलेले नाव हा एवढाच सुगावा पाेलिसांकडे हाेता. मृतदेह मिळून २० दिवस लाेटले तरी काहीच मिळत नव्हते. शंकर व निकिता या नावाच्या जाेडीचा शाेध सुरू झाला. या २० दिवसांत पाेलिसांनी यवतमाळ, आर्णी, घाटंजी, दारव्हा या चार तालुक्यांतील गावं पिंजून काढली. या दीर्घ प्रयत्नाला यश मिळाले. मृतदेहाची ओळख पटली. त्यासाेबतच मारेकरी काेण हेही पुढे आले. शेजारीच राहणाऱ्या जावयाने दारूड्या मेव्हण्याचा गळा घाेटून खून केला. नंतर मृतदेह पाेत्यात भरून दगडासह विहिरीत टाकल्याचे पुढे आले आहे.
शंकर चंद्रभान शेलकर (३५) रा. शास्त्रीनगर झाेपडपट्टी आर्णी असे मृत युवकाचे नाव आहे. शंकर हा त्याच्या बहिणीच्या घरा शेजारी झाेपडी बांधून राहत हाेता. दारू पिण्यासाठी गवंडी काम करणे एवढाच उद्याेग शंकर करत हाेता. दारू पिल्यानंतर ताे एखाद्या जनवाराप्रमाणे वागत असते. याच त्रासाला कंटाळून त्याची पत्नी निकिता त्याला साेडून माहेरी निघून गेली. त्यामुळे शंकरचा त्रास अधिकच वाढला. शंकरच्या बहिणीला माेठी मुलगी हाेती. त्याचेही भान शंकरला राहत नसे, अतिशय घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करत हाेता. ही बाब शंकरचे जावई रमेश मेटकर यांना खटकली.
शंकरचा बंदाेबस्त करण्यासाठी त्यांनी माेझर येथून एका मित्राला बाेलावले. शुक्रवार २१ जुलै राेजी शंकरला दारू पिण्याच्या बहाण्याने भांबराजा येथे आणले. तेथे त्याला शुद्ध हरपेपर्यंत दारू पाजली. नंतर त्याचा शेल्याने गळा आवळून खून केला. शंकरचा मृतदेह घेऊन रमेश व त्याचा मित्र राजेश हे दाेघे माेझर शेतशिवारात आले. रात्री ९ वाजताच्या दरम्यान मृतदेह एका पाेत्यात भरला त्यात दगड टाकले, ताराने बांधून हे पाेते विकास पांडे यांच्या शेतातील विहिरीत फेकले. हा घटनाक्रम उघड करण्यासाठी पाेलिसांना रात्रीचा दिवस करावा लागला. याप्रकरणी रमेश मेटकर (४५) रा. आर्णी, राजेश गडमले (३१) रा. माेझर यांना पाेलिसांनी अटक केली.
प्रत्येक 'शंकर'च्या घरी पाेहाेचले पाेलिस
खुनाचा छडा लावण्याकरता प्रथम मृतदेहाची ओळख पटविणे आवश्यक हाेते. यासाठी सहायक पाेलिस अधीक्षक तथा उपविभागीय पाेलिस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांनी पथक तयार केले. एलसीबीचे सहायक निरीक्षक संताेष मनवर, गणेश वनारे यांचे दाेन पथक, एसडीपीओ पथकाचे सहायक निरीक्षक सुगत पुंडगे, लाडखेड ठाणेदार स्वप्निल निराळे या सर्वांना कामाला लावले. शंकर- निकिता या जाेडीचा शाेध घेण्यासाठी यवतमाळ, आर्णी, दारव्हा, घाटंजी या तीन तालुक्यातील सर्व रेशन कार्ड, मतदार यादी यातून फक्त शंकर नावांची वेगळी यादी करत त्या प्रत्येकाच्या घरी पाेलिस जाऊ लागले.
हातावरील हनुमानाचा टॅटू, तंबाखू पुडी सुगावा
अनोळखी मृतदेहाच्या हातावर हनुमानाचा टॅटू गोंदलेला होता. तसेच त्याच्या हातावर शंकर-निकिता असे नाव होते. यासोबत मृताच्या खिशात तंबाखू पुडी सापडली. या एवढ्या सुगाव्यावरून पोलिसांनी १८ दिवसात अनोळखी युवकाच्या मृताची ओळख पटविली. त्यासाठी सलग संपूर्ण यंत्रणा कामाला लावला. प्रत्येक शंकर नावाच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.
शेलू शेंदूर सरणी येथे भेटली मृताची पत्नी
शंकरच्या शाेधात शाेधपत्रिका घेऊन पाेलिस आर्णी तालुक्यातील शेलू शेंदूर सरणी येथे पाेहाेचले. त्या गावातील जावाई शंकर असून त्याच्या पत्नीचे नाव निकिता असल्याची माहिती मिळाली. शंकरच्या मृतदेहाचा फाेटाे घेऊन पाेलिस थेट त्याच्या पत्नीजवळ पाेहाेचले तिने पतीचा मृतदेह पाहून हंबरडा फाेडला. शंकरला ९ महिन्यांची मुलगी व सहा वर्षांचा मुलगा आहे. पतीच्या त्रासाला कंटाळून निकिता माहेरी वडिलांकडे राहत हाेती. येथेच पाेलिसांचा तपास पूर्ण झाला. २० दिवसांच्या अथक परिश्रमानंतर हे यश मिळाले.