यवतमाळ : सध्या शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याचा ट्रेन्ड वाढला आहे. यात नोकरदार वर्ग सर्वात पुढे आहे. यवतमाळातील युवकाने खासगी नोकरीत असताना ओळख झालेल्या मित्राच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये नऊ लाख रुपयांची गुंतवणूक केली. पैशावर पाच टक्के व्याज देण्याचे आमिष दिले. व्याजाचे दोन लाख २५ हजार परत केले. मात्र सहा लाख ७५ हजार रुपये घेऊन पोबारा केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याशिवाय पर्याय उरला नाही.
नरेंद्रसिंग यादव (३५) रा. परवानीपुरा झाशी उत्तर प्रदेश असे आरोपीचे नाव आहे. स्वप्निल नानाजी वराडे (३२) रा. रेणुकानगर वडगाव ह.मु. त्रिमूर्तीनगर नागपूर या युवकाने नरेंद्र सोबत ओळख झाल्यानंतर शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविले. पाच टक्के व्याजासह काही दिवसात दुप्पट पैसे देण्याचे आमिष नरेंद्रने दिले. स्वप्निलने खात्री करण्यासाठी नरेंद्रशी स्वत:चा मोठा भाऊ राजेश याचेही बोलणे करून दिले. खात्री पटल्यानंतर स्वप्निल व राजेश या दोन भावांनी नऊ लाख रुपये शेअर मार्केटमध्ये गुंतविण्यासाठी नरेंद्र यादव याला दिले.
सुरुवातीचे काही दिवस नरेंद्रकडून नियमित व्याज मिळत होते. मात्र नंतर त्याने व्याज देणे बंद केले. तो काही दिवस संपर्कात होता. अधिक वेळ तगादा लावल्यानंतर नरेंद्र यादव याने स्वप्निलशी व्हॉटस्ॲपवरून सुरू असलेला संपर्कही बंद केला. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच स्वप्निल वराडे याने अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून कलम ४२० भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.