लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अमरावती कारागृहात जन्मठेप भोगत असलेल्या आरोपीला पॅरोलवर सोडण्यात आले. मात्र, तीन वर्षांपासून तो कारागृहात परतलाच नाही. नेर पोलीस सातत्याने त्याच्या मागावर होते. तरीही तो हाती लागत नव्हता. शेवटी पाय मोडल्यानंतर खासगी रुग्णालयात उपचार घेताना पोलिसांनी त्याला अटक केली. शम्मी उल्ला अनवर खॉ पठाण (६१) रा. नबाबपूर नेर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शम्मी उल्ला याने एकाच निर्घृणपणे खून केला. या गुन्ह्यात त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. तो अमरावती कारागृहात शिक्षा भोगत होता. २०१९ मध्ये त्याला पॅरोलवर सोडण्यात आले. मात्र, पॅरोल संपली तरी तो कारागृहात परतला नाही. नेर पोलीस सातत्याने त्याचा शोध घेत होते. मागील तीन वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर त्याचा पाय फ्रॅक्चर झाल्यानंतरच तो पोलिसांच्या हाती लागला. यवतमाळातील दत्त चौक परिसरातील एका अस्थीव्यंगोपचार तज्ज्ञाकडे उपचार घेण्यासाठी शम्मी उल्ला भरती झाला. १८ ऑक्टोबरला तो रुग्णालयात आला. महात्मा फुुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार मिळावा यासाठी त्याने अर्ज केला. रेशन कार्ड व आधारकार्ड रुग्ण सेवकाकडे दिले. मात्र, त्यावरील नाव अस्पष्ट असल्याने त्याला तहसीलदारांचा दाखला आणण्यास सांगितले. येथूनच शम्मी उल्ला याचा मागोवा नेर पोलिसांना मिळाला. नेर पोलिसांनी तीन वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या शम्मी उल्लाची गोपनीय माहिती गोळा करणे सुरू केले. यात तो अपघातामध्ये जखमी झाला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी काही मोबाईल लोकेशनही ट्रेस करणे सुरू केले. यवतमाळातील दत्त चौक परिसरातील मोबाईल लोकेशन मिळत होते. नेर पोलिसांनी दत्त चौक परिसरात असलेले सर्व अस्थीव्यंगोपचार तज्ज्ञांची रुग्णालये हुडकली. बॅंक ऑफ इंडियाच्यासमोर असलेल्या येलनारे हाॅस्पिटलमध्ये शम्मी उल्ला उपचार घेत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी त्याला अटक करण्याचा निर्णय घेतला. मात्र, नातेवाइकांनी विनंती व गयावया केली. शिवाय शम्मी उल्ला याचा पाय फ्रॅक्चर झाला होता. नेर पोलिसांनी मानवी दृष्टिकोनातून विचार करीत त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिली. पोलिसांच्या बंदोबस्तातच शम्मी उल्ला याच्या पायावर शस्त्रक्रिया झाली. नंतर २५ ऑक्टोबरला सकाळी नेर पोलिसांनी शम्मी उल्ला याला अटक करून त्याची रवानगी अमरावती कारागृहात केली.
गोपनीय खबर ठरली महत्त्वाची - सातत्याने गुंगारा देणाऱ्या शम्मी उल्ला याचा अपघात झाला. त्यात त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. ही गोपनीय खबर पोलिसांपर्यंत पोहोचली. त्यानंतर पोलिसांनी शम्मी उल्ला याचा शोध सुरू केला. त्याच्या प्रत्येक मिनिटाच्या हालचाली टिपण्यासाठी जवळच्या नातेवाइकांना ट्रॅक केले. यातूनच तो थेट रुग्णालयात उपचार घेतानाच नेर पोलिसांना गवसला.