संजय भगत
महागाव : सेवानिवृत्त सचिवांना कार्यमुक्त करणे बंधनकारक असताना २०१७-१८ पासून तीन ते चार सोसायट्यांचा पदभार देण्यात आला. कोट्यवधींचे कर्ज वाटप करण्यात आले. सेवानिवृत्त सचिव जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा उपनिबंधक आणि जिल्हा देखरेख सहकार अधिकारी संस्थेच्या आशीर्वादाने खुर्च्या बळकावून बसल्यामुळे त्यांना सोसायटीत मनमानी करण्यास रान मोकळे झाले आहे.
तालुक्यात सर्वात मोठ्या असलेल्या मुडाणा सोसायटीची वसुली शून्यावर आली. आमनी बु., आंबोडा, मुडाणा, चिलगव्हाण, शिरपूर, मोहदी, गुंज, हिवरा आणि हुडी आदी सोसायट्यांवर दोन सेवानिवृत्त सचिव काम करीत आहे. त्यांना सचिव म्हणून का ठेवण्यात आले, याविषयी सोसायटी अध्यक्षांना ८ जुलै २०२१ रोजी पत्र पाठवून विचारणा केली आहे. मात्र, तीन महिने लोटूनही पत्राला कोणत्याही अध्यक्षांनी उत्तर दिले नाही.
वास्तविक देखरेख संस्थेच्या नियुक्त सचिवाकडूनच कामकाज करून घेणे बंधनकारक आहे. वरिष्ठ कार्यालयाची परवानगी न घेता सचिव नियुक्त करून संस्थेचा प्रभार व स्वाक्षरीचे अधिकार का देण्यात आले, याबाबत जिल्हा देखरेख सहकारी संस्थेकडून आठ दिवसांत खुलासा मागविण्यात आला आहे. या पत्राविषयी अध्यक्षांनी संचालक मंडळाला अंधारात ठेवल्याची माहिती समोर आली आहे.
ज्या सचिवांविषयी ही माहिती द्यायची आहे, असे सचिव त्या पदावर कार्यरत असल्यामुळे देखरेख संस्थेने पाठवलेले पत्र संचालक मंडळापुढे ठेवलेच नाही. जिल्हा मध्यवर्ती बँकेने अशा सोसायट्यांच्या माध्यमातून कोट्यवधींचे कर्ज वाटप केले. विशेष म्हणजे काही सोसायट्यांमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती असून, त्यांची वसुली शून्यावर आली आहे.
बॉक्स
बनावट कागदपत्रांवर वाटले कर्ज
चिलगव्हाण सोसायटीने बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधींचे कर्ज वाटप केल्याची तक्रार जिल्हा बँकेकडे करण्यात आली आहे. बँकेचे विभागीय अधिकारी या सोसायटीची गेल्या काही महिन्यांपासून चौकशी करीत आहेत. संस्थेचे सचिव सेवानिवृत्त आणि तात्पुरते असल्यामुळे कर्ज वसुलीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सेवानिवृत्तांच्या नियुक्तीला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या काही संचालकांचा आशीर्वाद असल्याचे सांगितले जाते.
कोट