लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : तालुक्यातील मन्याळी येथील ग्रामस्थांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करताना कोरोनाची तपासणी करण्याचा संकल्प केला. त्यानुसार १५० जणांची कोरोना तपासणी केली असता, १९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
पॉझिटिव्ह आलेल्यांना आरोग्य यंत्रणेने अलगीकरणात ठेवले आहे. मन्याळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी माजी आमदार विजयराव खडसे, प्रा. डॉ. अनिल काळबांडे यांनी कोविडविषयी तपासणी व लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर व्हावेत, यासाठी मार्गदर्शन केले.
ग्रामस्थांनी कोरोना तपासणी करण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार १७ एप्रिल रोजी कोरोना तपासणी शिबिर घेण्यात आले. ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने रांग लावून तपासणी करून घेतली. या शिबिराचे आयोजनाकरिता उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस, तहसीलदार आनंद देऊळगावकर, गटविकास अधिकारी प्रवीण वानखेडे, डॉ. चंदा डोंगे, डॉ. किरण मुद्दलवार, तलाठी गजानन सुरोशे, संतोष गवळे, राणी राजपल्लू, ज्योतिराम जळकोट, शेख रिफत, आशा सेविका राखी काळबांडे, जमादार भाऊ जारंडे, खांबकर, सरपंच आशा मनवर, ग्रामपंचायत सदस्य, पोलीसपाटील आदींसह ग्रामस्थांनी सहकार्य केले.
बॉक्स
गावात विनाकारण फिरू नये
मन्याळीत एवढ्या मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण सापडणे ही धोक्याची घंटा आहे. यामुळे वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे. जे पॉझिटिव्ह आहेत, त्यांनी स्वतःहून कुटुंबापासून अलगीकरणात राहावे. काही त्रास जाणवल्यास लगेच आरोग्य यंत्रणेशी संपर्क करावा. ग्रामस्थांनी गावात विनाकारण फिरू नये. तसेच कामानिमित्त बाहेर पडल्यास मास्कचा वापर करावा, असे आवाहन सरपंच आशा मनवर यांनी केले आहे.