प्रकाश लामणेपुसद(यवतमाळ) : साखरपुड्यासाठी मोजकी मंडळी जमली. लग्नाची तारीख १४ मे ठरली. पण तेवढ्यात एक समंजस माणूस पुढे आला. कोरोना विषाणू पसरू नये म्हणून गर्दी टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे आपणही लग्नाची गर्दी टाळली तर बरे होईल, असा प्रस्ताव ठेवला. वर आणि वधू अशा दोन्हीकडील मंडळींनी हा प्रस्ताव लगेच मान्य केला अन् साखरपुड्यातच साधा विवाह सोहळा पार पडला.शासनाच्या आवाहनाला मान देत अन् स्वत:च्या इच्छांना मुरड घालत हा आदर्श विवाह सोहळा रविवारी ८ मार्च २०२० रोजी येथील विरंगुळा केंद्रात पार पडला. १४ मे रोजी ठरलेला लग्नसोहळा दोन महिने आधीच ८ मार्च रोजी झाला. येथील पालडीवाल ले-आउटमधील शेतकरी कैलासराव कदम यांची सुकन्या दिपाली आणि वाशिम जिल्ह्यातील किनखेडा येथील शेतकरी किसनराव अवचार यांचे चिरंजीव शुभम यांचा विवाह नुकताच जुळला होता. लग्नाची तारीखही ठरली होती. तत्पूर्वी रविवारी त्यांचा साखरपुडा येथील विरंगुळा केंद्रात आयोजित करण्यात आला होता. दोन्हीकडील निवडक मंडळी या छोटेखानी कार्यक्रमासाठी जमली होती. साखरपुडा झाला अन् पाहुण्यांमध्ये ‘कोरोना’ची चर्चा सुरू झाली. मेहकर (जि. बुलडाणा) येथील प्राचार्य प्रतापराव देशमुख यांनी वेगळाच प्रस्ताव सर्वांसमोर ठेवला. कोरोनामुळे शासनाने गर्दी व यात्रा आदी टाळण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे आपण साखरपुड्यातच लग्न आटोपले तर चालेल का, असा प्रस्ताव त्यांनी सर्वांपुढे मांडला. त्यावर दोन्ही बाजूंनी होकार आला. जेवढे पाहुणे, नातेवाईक साखरपुड्यासाठी हजर होते, त्यांच्या साक्षीनेच हा छोटेखानी पण आदर्श विवाह सोहळा पार पडला. वाजंत्री नाही, आहेर नाही, मानपान नाही. कोणताही बडेजाव न करता पुसद तालुक्यातील सावंगी येथील बाळू देशमुख यांनी मंगलाष्टके व लग्नविधी पार पाडले.
-----------------मराठा सेवा संघाचे विचार आम्ही आत्मसात केले असून अॅड. पुरुषोत्तम खेडेकर यांना आदर्श मानतो. त्याच पद्धतीने मुलीचे लग्न व्हावे, असे वाटत होते. मात्र कोरोनाच्या भीतीपोटी आम्ही जास्त लोकांना आमंत्रित न करता साखरपुड्यातच लग्न उरकून घेतले.- डॉ. गणेश कदम, नववधू दिपालीचे वडील
-----------------आमचे शेतकरी कुटुंब असून एकुलता एक मुलगा शुभम याचे लग्न बºयापैकी व्हावे अशी इच्छा होती. १४ मे ही लग्नाची तारीख ठरली होती. मात्र कोरोनामुळे शासनाने जमाव, यात्रा आदींवर बंदी घातली आहे. त्याला प्रतिसाद म्हणून साखरपुड्यातच साध्या पद्धतीने विवाह उरकला.- किसनराव अवचार, नवरदेव शुभचे वडील