दिग्रस : दागिने चमकवून देण्याच्या नावाखाली महिलेला गंडविल्याची घटना येथील गंगानगर परिसरात बुधवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. भामटे २४ सोन्याचे मनी असलेली पोत घेऊन पसार झाले. येथील गंगानगर परिसरातील सारिका संजय लोखंंडे यांच्या घरी बुधवारी दुपारी २ अज्ञात इसम आले. तुमच्या घरचे सोन्या-चांदीचे दागिने व भांडी चमकवून देतो, असे सांगू लागले. प्रथम या दोघांनी तांब्याचा गडवा आणि चांदीचे जोडवे जवळच्या पावडरने चमकवून दिले. त्यामुळे सारिकाचा या दोघांवर विश्वास बसला. त्यानंतर सारिकाने २४ सोन्याचे मनी असलेली पोत या दोघांकडे चमकविण्यासाठी दिली. त्यांनी ही पोत कुकरमध्ये ठेऊन त्यात पाणी आणि पावडरचे मिश्रण टाकले. एक तास गॅसवर कुकर ठेऊन नंतर काढा म्हणजे तुमची पोत चमकेल, असे सांगत कुकर ताब्यात दिला आणि हे दोघेही निघून गेले. एक तासानंतर कुकर उघडून बघितला तेव्हा त्यात पोत नव्हती. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती स्थानिक पोलिसात देण्यात आली. सदर भामटे काळ्या सावळ्या रंगाचे असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
दिग्रसमध्ये सोने पॉलिशच्या नावाने मंगळसुत्र लंपास
By admin | Published: December 24, 2015 3:01 AM