उमरखेड (कुपटी) : पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हजारो लोकांना फसविणाऱ्या नाशिकच्या ‘केबीसी’ कंपनीने यवतमाळ जिल्ह्यातही अनेकांंना गंडा घातल्याचे पुढे येत आहे. या कंपनीचे एजंट पसार झाले असून फसवणुकीत सर्वाधिक बळी पडले ते कर्मचारी. नाशिक येथील केबीसी कंपनीने कमी दिवसात चौपट कमवा ही योजना सुरू केली होती. त्यासाठी अनेक एजंट नेमण्यात आले होते. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड, पुसद, दिग्रस, दारव्हा, नेर, घाटंजी, वणी, महागाव, आर्णी तालुक्यातील नागरिकांना या कंपनीच्या एजंटांनी टार्गेट केले. अल्पावधीत पैसे चौपट होत असल्याने अनेक जण त्यांच्या गळी लागले. यात सर्वाधिक कर्मचाऱ्यांचा भरणा आहे. उमरखेड तालुक्यात येणाऱ्या मुळावा, वाणेगाव या ठिकाणी एजंट नेमले होते. त्यांनी खेडोपाडी जाऊन आणखी एजंट नेमलेत. १७ हजार गुंतवा आणि तीन वर्षात तिप्पट कमवा, ८६ हजार गुंतवा आणि तीन वर्षात तिप्पट कमवा अशी ही योजना होती. या योजनेत ग्राहकाकडून एजंटाला तत्काळ सात हजार रुपये तर ८६ हजार रुपयाच्या योजनेत टक्केवारीने कमिशन मिळत होते. त्यामुळे स्वार्थापोटी या एजंटांनी शेतकरी, कर्मचाऱ्यांना समाविष्ठ करून घेतले. अनेकांनी या योजनेत सुरुवातील पैसे भरले. पहिल्या सहा महिन्यात पैसे परत करण्यात आले. त्यामुळे इतरांचा त्यावर विश्वास बसला. परिणामी मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक होऊ लागली. उमरखेड तालुक्यासह जिल्ह्यातील इतर भागातही याचे लोण झपाट्याने पसरले. शिक्षक, आरोग्य कर्मचारी, पाटबंधारे विभागातील कर्मचारी केबीसीच्या जाळ्यात अडकले. अनेकांनी तर सोने विकून प्लॉट गहाण ठेऊन या योजनेत पैसे भरले. परंतु आता या कंपनीने नागरिकांंना गंडा घातल्याचे लक्षात आले. कंपनीचा सूत्रधार भाऊसाहेब चव्हाण याने महाराष्ट्रातील जनतेची १० हजार कोटी रुपयांनी फसवणूक केल्याचे पुढे आले. उमरखेड तालुक्यातून अद्याप कुणी तक्रार केली नाही. मात्र त्यांचे एजंट पसार झाल्याचे दिसून येतात. यामुळे गुंतवणूकदार हवाल झाले आहे. (वार्ताहर)
‘केबीसी’चा यवतमाळ जिल्ह्यातही अनेकांना गंडा
By admin | Published: July 21, 2014 12:25 AM