महागाव : वीज वितरण कंपनीच्या गोडबोले अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे महागाव शहरासह तालुक्यातील अनेक गावे गेल्या १२ तासांपासून विजेशिवाय आहेत. शुक्रवारची रात्रही शहरवासीयांना अंधारात काढावी लागली.
महागाव येथे शुक्रवारी मध्यरात्रीपासून वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे रात्रभर अंधार होता. विजेच्या लपंडावामुळे वीज वितरण कंपनीविरोधात संताप वाढत आहे. विजेअभावी शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही. अनेकांना सकाळी अंघोळीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागली. तालुक्यातील अंबोडा फिडरवरील शेतकऱ्यांना तर सततचा त्रास आहे. गावफिडरची हीच स्थिती आहे.
संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केल्यास थांबा, उद्या तुमच्या गावात कार्यवाहीसाठी येतो, मग पाहू, आधी तुमचा ग्राहक क्रमांक सांगा, अशी उत्तरे दिली जातात. वीज नसल्याने विद्यार्थ्याच्या ऑनलाईन शिक्षणात खोडा येत आहे. अधिकारी नोकरीच्या आड ठेकेदारी करून माया गोळा करीत आहेत. यवतमाळ येथील एका कंत्राटदाराच्या नावे तालुक्यातील विविध ठिकाणचे काम करण्यात आले. ‘त्या’ गोडबोल्या अधिकाऱ्याच्या संपत्तीची चौकशी करावी, अशी जनतेमधून मागणी होत आहे.
बॉक्स
अंबोडा फिडर सतत बंदच
महागाव येथील संबंधित वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या दंडेलशाहीमुळे त्यांच्या हाताखाली कोणीही काम करायला तयार नाही. अंबोडा फिडर नेहमी बंद राहतो. सातत्याने अधिकाऱ्यांना फोन करून विचारले तर कधीच समाधानकारक उत्तर मिळत नाही. गावाला लाईनमनची सक्त आवश्यकता असताना अधिकारी कानाडोळा करीत आहेत, असा संताप अंबोडाचे माजी सरपंच हणमंतराव देशमुख यांनी व्यक्त केला.
कोट
सवना शिवारात शुक्रवारी रात्री ब्रेकडाऊन झाला. रात्र असल्याने दोष दुरुस्त करता आला नाही. लाईन सुरू करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
- विनोद चव्हाण, उपविभागीय अभियंता, वीज वितरण कंपनी, महागाव