वणी : गेल्या अनेक वर्षांपासून चार किलोमीटर लांबीच्या राजूर रिंगरोडचे काम थंडबस्त्यात पडले आहे. लोकप्रतिनिधींनी या रिंगरोडला मंजुरी मिळाल्याची आवई उठवून जनतेची दिशाभूल केल्याचे आता स्पष्ट झाले आहे.वणी ते यवतमाळ या राज्य मार्गापासून काही दूर अंतरावर वणीलगतच तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेले राजूर (कॉलरी) गाव आहे. गावाची लोकसंख्या जवळपास १५ हजारांच्यावर आहे. या गावात चुन्याच्या अनेक खाणी आहेत. येथील चुना संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. ब्रिटिशांच्या काळात याच गावात पहिली कोळसा खाण सुरू झाली होती. त्यानतंर तालुक्यात अनेक कोळसा खाणी अस्तित्वात आल्या. एकूणच हे गाव औद्योगिकदृष्ट्या तालुक्यातील इतर गावांपेक्षा कितीतरी पुढे आहे. तथापि विकासाचा शाप लागल्याने हे गाव आता मागे पडले आहे. ग्रामस्थांना धड रस्ताही मिळत नसल्याने राजूरवासीय त्रस्त आहे.वणी-यवतमाळ राज्य मार्गापासून या गावाला जोडण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपूर्वी चार किलोमीटरचा डांबरी रस्ता तयार करण्यात आला. याच रस्त्याचा ग्रामस्थ सध्या वापर करीत आहेत. हा रस्ता तयार झाल्यानंतर मात्र त्याच्या देखभाल आणि दुरुस्तीकडे दरवर्षी दुर्लक्ष झाले. परिणामी या आता रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. याच रस्त्यावरून कोळसा, गिट्टी, चुना भरलेली वाहने धावत असल्याने रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली. ठिकठिकाणी मोटमोठे खड्डे पडले आहेत. त्यातून वाहन काढणे कठीण झाले आहे. दुचाकीस्वारांनाही प्रवास करताना डोळ्यात तेला घालूनच वाहन चालवावे लागत आहे. जुन्या रस्त्याची भयावह अवस्था झाल्याने वणी ते यवतमाळ या राज्य मार्गापासून राजूरला जोडण्यासाठी रिंगरोडचा प्रस्ताव तयार करण्यात आला. गावाला वळसा घालून हा रिंगरोड राजूरमध्ये पोहोचणार होता. मात्र प्रत्यक्षात हा रिंगरोड अद्याप कागदावरच आहे. लोकप्रतिनिधींनी अनेकदा हा रिंगरोड मंजूर झाल्याची आवई उठविली होती. या रस्त्याच्या आजूबाजूला आजपर्यंत काही कोल वॉशऱ्या होत्या. सोभतच राजूर येथे चुना उद्योग आहे. हाच मार्ग पुढे जगन्नाथ महाराज यांच्या भांदेवाडा येथील मंदिराकडे जातो. त्यामुळे या रस्त्यावरून सतत वाहनांची वर्दळ असते. मात्र आजपर्यंत सुरू असलेल्या कोल वॉशऱ्यांच्या अवजड वाहनांमुळेच या रस्त्याची वाट लागली आहे. रस्ता दयनीय झाल्याने काही वर्षांपूर्वी संबंधित वॉशऱ्यांकडून काही प्रमाणात निधी घेऊन प्रस्तावीत रिंगरोडची कल्पना मांडण्यात आली होती. या वॉशऱ्यांनी निधी देण्याचे मान्यही केले होते. त्यानंतर या प्रस्तावित रिंगरोडच्या बांधकामासाठी त्यावेळी निविदाही काढण्यात आली. वणीतील एका कंत्राटदाराला रस्ता बांधकामाचे कंत्राटही देण्यात आले होते. कंत्राटदाराने रस्ता बांधण्यासाठी त्यावेळी बांधकाम साहित्यही आणले होते. मात्र त्यानंतर ‘कुठे माशी शिंकली, कुणास ठावूक’, या रिंगरोडचे काम थंडबस्त्यात पडले. ते अद्यापही सुरूच होऊ शकले नाही. यामागे काय गूढ लपले, हे कुणालाच माहीत नाही. (कार्यालय प्रतिनिधी)
अनेक वर्षांपासून राजूर रिंगरोडचे काम थंडबस्त्यात
By admin | Published: June 14, 2014 11:52 PM