अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्क, यवतमाळ: राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्यांना नव्या पद्धतीचे शिक्षण देण्यासोबतच नवे नेतृत्व घडविण्यासाठी ‘प्रेरणा उत्सव’ राबविला जाणार आहे. या उपक्रमासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सयाजीराव गायकवाड यांनी स्थापन केलेल्या व्हर्नाक्युलर शाळेची निवड केली आहे. येथे देशभरातील विद्यार्थ्यांना आठवडाभर प्रशिक्षण देऊन त्यांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात शिक्षणाचे नवे वारे पोहोचविले जाणार आहेत. या निमित्ताने एका मराठी माणसाची शाळा देशभरातील शिक्षणव्यवस्थेला दिशा दाखविणार आहे.
नाशिकमध्ये जन्मलेल्या आणि नंतर बडोदा संस्थानचे सर्वाधिकारी झालेल्या सयाजीराव गायकवाड यांनी १८८८ साली वडनगरमध्ये (गुजरात) व्हर्नाक्युलर शाळा स्थापन केली होती. प्राचीन भारतीय वारसा आणि आधुनिक शिक्षणपद्धती अशा दोहोंची सांगड घालून या शाळेत शिक्षण दिले जात आहे. त्यामुळेच केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ‘प्रेरणा उत्सवा’साठी या शाळेची निवड केली आहे. प्रेरणा उत्सवासाठी प्रत्येक राज्यातील जवाहर नवोदय विद्यालय हे नोडल सेंटर आहे. महाराष्ट्रातही नवोदय विद्यालयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
उत्सव काय आहे? - विद्यार्थ्यांना वडनगरच्या शाळेत सात दिवस देशातील नामवंत शिक्षणतज्ज्ञांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाईल. - यामध्ये सर्व राज्यांतील सीबीएसई, राज्य शिक्षण मंडळासह सर्वच शाळांमधील नववी ते बारावीच्या निवडक विद्यार्थ्यांचा समावेश केला जाणार आहे. जुनी परंपरा, देशाचा वारसा आणि आधुनिक ज्ञान, तंत्रज्ञान यांची सांगड या प्रशिक्षणात असेल. - प्रत्येक आठवड्याला देशाच्या कोणत्याही एका प्रांतातील २० विद्यार्थ्यांना वडनगरच्या शाळेत ठेवले जाणार आहे.
काय शिकविणार? प्रेरणा उत्सवातील सात दिवसांचा अभ्यासक्रम गांधीनगर आयआयटीने तयार केला आहे. नऊ मूल्यांवर आधारित हा अभ्यासक्रम आहे. स्वाभिमान आणि विनय, शौर्य आणि साहस, परिश्रम आणि समर्पण, करुणा आणि सेवा, विविधता आणि एकता, सत्यनिष्ठा आणि शुचिता, नवाचार आणि जिज्ञासा, श्रद्धा आणि विश्वास, स्वातंत्र्य आणि कर्तव्य या नऊ मूल्यांवर आधारित शिक्षण दिले जाईल.
अशी होणार विद्यार्थ्यांची निवड येत्या १७ एप्रिलपर्यंत कोणत्याही एका दिवशी शाळास्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन करून त्यात सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची निवड होईल. या दोन विद्यार्थ्यांना २३ एप्रिलला जिल्हास्तरीय निवड प्रक्रियेसाठी पाठविले जाईल. ही निवड प्रक्रिया परिसरातील जवाहर नवोदय विद्यालयात होईल. तेथे सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना वडनगर (गुजरात) येथील प्रेरणा उत्सवासाठी पाठविले जाणार आहे. तेथील एका आठवड्याच्या शिक्षणानंतर त्यांच्या अनुभवाचा आधार घेतला जाईल.