लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ (राम शेवाळकर परिसर, वणी ) : विदर्भाची भूमी ही समृद्ध आहे. येथे अनेक गोष्टी पहायला, अनुभवायला मिळतात. झाडीपट्टी नाट्य महोत्सव असो वा दंडार या आणि अशा साहित्य परंपरांना मराठी मनांनी कायम जपल्या आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केले.विदर्भ साहित्य संघाच्यावतीने आयोजित येथील राम शेवाळकर परिसरात ६६ व्या विदर्भ साहित्य संमेलनात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष डॉ. शिरीष देशपांडे, प्रमुख पाहुणे म्हणून चित्रपट दिग्दर्शक राजदत्त, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, वणीचे आमदार तथा स्वागताध्यक्ष संजीवरेड्डी बोदकुरवार, वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, आमदार राजू तोडसाम, आशुतोष शेवाळकर, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैैसाळकर, कार्याध्यक्ष वामन तेलंग, सरचिटणीस विलास मानेकर, माजी कुलगुरू भालचंद्र चोपने, सुनील कातकडे, विजयराव देशमुख, आमंत्रक शुभदा फडणवीस, मुख्य संयोजक माधवराव सरपटवार, वणी तालुका शाखाध्यक्ष दिलीप अलोणे, नरेंद्र नगरवाला उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ऐतिहासिक आणि साहित्य भूमी असलेल्या वणी शहरात आयोजित या संमेलनाच्या उद्घाटनासाठी मला बोलावले, त्याचा मला आनंद आहे. या शहराने अनेक साहित्यरत्न दिलेत, असे सांगत प्राचार्य राम शेवाळकर, लोकनायक बापूजी अणे, वसंत आबाजी डहाके यांच्या नावांचा त्यांनी उल्लेख केला. साहित्य हे कल्पना विलास नाही. साहित्यातून वास्तवता प्रतिबिंबीत होते. समाजनिर्मितीचे कामच साहित्यातून होते, असेही ते म्हणाले. सारगर्भीत साहित्य समाजापुढे येत नाही. अलिकडे संक्रमणाची अवस्था सुरू आहे. तंत्रज्ञान विकसित होत आहे. त्यामुळे मूलभूत साहित्याचे काय होणार, अशीही भीती वाटायला लागते असे सांगून जोपर्यंत मराठी माणूस जीवंत आहे, तोपर्यंत साहित्य संपणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.यावेळी ना.हंसराज अहीर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, राजदत्त संमेलनाध्यक्ष शिरीष देशपांडे यांनीही मनोगत व्यक्त केले. ‘बहुगुणी वणी’ या विदर्भ साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.संचालन प्रा.डॉ.अभिजीत अणे यांनी तर प्रास्ताविक शुभदा फडणवीस यांनी, तर आभार गजानन कासावार यांनी मानले. साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला साहित्य रसिकांनी संमेलनस्थळी तुडूंब गर्दी केली होती. तत्पूर्वी सकाळी वणी शहरातून गंथदिंडी काढण्यात आली. यात संमेलनाध्यक्ष शिरीष देशपांडे यांच्यासह आयोजन समितीतील पदाधिकारी, शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी तथा नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.समाज घडविण्यात लेखकांचे योगदान - संमेलनाध्यक्ष डॉ. शिरीष देशपांडेवणी हे कामगार क्षेत्र असतानाही येथे वाचनाची आवड आहे, ते येथे जमलेल्या गर्दीवरून दिसून येते. समाज घडविण्यामध्ये लेखकांचे महत्वाचे योगदान असून क्रांती घडवून आणण्याची ताकद लेखकांमध्ये असल्याचे प्रतिपादन विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. शिरीष देशपांडे यांनी केले.
झाडीपट्टी असो वा दंडार, साहित्य परंपरांना मराठी मनाने कायमच जपले; देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 6:36 PM
झाडीपट्टी नाट्य महोत्सव असो वा दंडार या आणि अशा साहित्य परंपरांना मराठी मनांनी कायम जपल्या आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केले.
ठळक मुद्दे वणी येथे विदर्भ साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन