प्रज्ञा केळकर-सिंग ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) : संमेलन सुरळीत पार पडत असल्याचे चित्र वरवर पहायला मिळत असले तरी वादाची धगधग अद्याप कायम आहे. संमेलन अर्थकारणामुळे वादात सापडले आणि स्वागताध्यक्षांच्या दबावाखाली आयोजकांनी सहगल यांचे निमंत्रण मागे घेतले असा घणाघाती आरोप महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी केला आहे. दुसरीकडे, आपण सहिष्णू आहोत, अशी भूमिका घेत स्वागताध्यक्ष आणि पालकमंत्री मदन येरावार यांनी पलटवार केला आहे. त्यामुळे वादामागचा नेमका सूत्रधार कोण, याबाबतचे गूढ अद्याप कायम आहे.अरूणा ढेरे यांनी भाषणात हुशारीने खेळी खेळणाºया शक्तींचा जो उल्लेख केला, त्या शक्तींना सलाम करायचा, त्यांना उघड करायचे की सगळ्यांना सगळे ठाऊक असूनही सामूहिकरीत्या दुर्लक्ष करायचे हे ज्याचे त्याने ठरवावे, असे मत डॉ. श्रीपाद जोशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.नयनतारा उपस्थित राहिल्यास संमेलन उधळून टाकण्याचा इशारा मनसेच्या स्थानिक नेत्याने दिला आणि वादाची पहिली ठिणगी पडली. आयोजक आणि महामंडळ अध्यक्ष यांच्यात आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असताना अचानक जोशी यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले. चूक आपली नसली तरी घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपण राजीनामा देत असल्याचे डॉ.जोशी यांनी जाहीर केले. प्रत्यक्षात, या घटनेचा कर्ता-करविता कोण, हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहिला आहे.संमेलन संपेपर्यंत माध्यमांशी संवाद साधणार नाही, अशी भूमिका घेतलेली असतानाच डॉ. श्रीपाद जोशी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत 'घडलेल्या घटनेला स्वागताध्यक्ष जबाबदार आहेत', असा आरोप केला आहे. नयनतारा सहगल यांचे निमंत्रण मागे घेतले नाही, तर संमेलनाच्या अर्थकारणावर परिणाम होईल, असे एकीकडे सांगण्यात आले आणि दुसरीकडे सर्व घटनेचे खापर महामंडळाच्या अध्यक्षांवर फोडले, ही लाजीरवाणी घटना आहे’, असेही ते म्हणाले.विश्वसनीय सूत्रांनी 'लोकमत'ला दिलेल्या माहितीनुसार, नयनतारा यांचे निमंत्रण रद्द केल्यास काय परिणाम होऊ शकतात, याबाबत पूर्वकल्पना दिली होती. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसळकर यांच्या मध्यस्थीने आयोजक समितीने निमंत्रण रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि नयनतारा सहगल यांना खेद व्यक्त करणारे पत्र पाठवायचे, असे ठरवण्यात आले. यावेळी झाल्या प्रकाराचे काय पडसाद उमटू शकतात, याची कल्पना आणि त्यातील भीषणता याबाबत जोशी यांनी आयोजक समितीला कल्पना दिली होती. मात्र, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त केल्यावरही आयोजकांना भूमिका बदलता येणे शक्य होते. मात्र, आगामी निवडणुकांचा माहोल लक्षात घेऊन सहगल याचे भाषण विपरित परिणाम साधणारे ठरू शकते, असे वाटल्याने आयोजकांवर स्वागताध्यक्षांनीच दबाव टाकला. नयनतारा व्यासपीठावर आल्यास संमेलनासाठी एक पैसाही मिळणार नाही, अशी धमकी देण्यात आल्याचे समजते. संंमेलनातील अनेक सहभागी निमंत्रितांनी बहिष्कार टाकण्याची घोषणा केल्यानंतर आयोजकांनी महामंडळाशी संवाद साधणेच बंद केले. त्यामुळे राजकीय दबाव हेच यामागचे कारण असल्याचे बोलले जात आहे.हा आगळावेगळा जीवनानुभव हीच लेखकांची उर्जा असते. कोणी डावा, कोणी उजवा ठरवल्याने माझे मला ठाऊक असलेले मूल रूप मलिन, प्रदूषित न होऊ देता मी ते व्यवस्थित जपलेले आहे. तुकाराम वाचून कळत नाही. तो असे जगून कळतो, हे कळायला सहकार्य हा अनुभव देणाऱ्यांनी केले आहे. अरूणा ढेरे यांनी हुशारीने खेळी खेळणाऱ्या अशा शक्तींचा जो भाषणात उल्लेख केला, त्या शक्तींना सलाम करायचा, त्यांना उघड करायचे की सगळ्यांना सगळे ठाऊक असूनही सामूहिकरीत्या दुर्लक्ष करायचे हे ज्याचे त्याने ठरवावे. वेड पांघरून साऱ्यांनाच पेडगावलाच अजूनही जाण्याचीच इच्छा कायम असेल तर ती ज्याची त्याला लखलाभ असो.- डॉ. श्रीपाद जोशीसहगल यांचे निमंत्रण रद्द होण्याबाबत डॉ. श्रीपाद जोशी यांनी सुरुवातीला मनसेला, नंतर आयोजकांना जबाबदार धरले. आयोजकांनी निमंत्रण परस्पर रद्द केले असे आधी जोशी म्हणाले, मग आपण केवळ इंग्रजी मसुदा लिहुन दिल्याची कबुली त्यांनी दिली. त्यानंतर मी आयोजकांवर राजकीय दबाव टाकल्याचा आरोप जोशी यांनी केला. कोणा-कोणावर आरोप करायचे आहेत, याची यादी एकदा त्यांच्याकडून मागवून घ्यायला हवी.यवतमाळमधील संमेलन हे येथील लोकांसाठी गौरवास्पद बाब आहे. कोलते यांना मी अनेक वर्षांपासून ओळखतो. संमेलनाचे निश्चित झाल्यानंतर मी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. स्वागताध्यक्षपदही भूषवण्याचा माझा आग्रह नव्हता. संमेलनामध्ये कोणाला बोलवावे, कोणाला बोलवू नये यामध्ये मी पहिल्यापासून हस्तक्षेप केलेला नाही. संमेलनाच्या पूर्वी सर्व प्रक्रिया सुरू असताना जोशी यांनी माझ्याशी एकदाही संवाद साधलेला नाही. त्यामुळे एकूणच निमंत्रण रद्द करण्याच्या प्रक्रियेमध्ये माझा सहभाग नाही.- मदन येरावार, स्वागताध्यक्ष आणि पालकमंत्री
हुशारीने खेळी खेळणाऱ्या राजकीय शक्तींना सलामच ठोकणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 8:53 PM
संमेलन अर्थकारणामुळे वादात सापडले आणि स्वागताध्यक्षांच्या दबावाखाली आयोजकांनी सहगल यांचे निमंत्रण मागे घेतले असा घणाघाती आरोप महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी केला आहे.
ठळक मुद्देडॉ. श्रीपाद जोशी यांचा सवालस्वागताध्यक्षांचाही पलटवार