यवतमाळ - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ऐन तोंडावर साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांनी राजीनामा देऊन स्वत:ची सुटका करून घेतली, तर संमेलनाला आणि संमेलनाच्या आयोजकांना मात्र वा-यावर सोडले. सुरवातीपासून एककल्ली कारभाराचा आरोप असलेल्या महामंडळ अध्यक्षांनी जाता-जाताही नव्या उद्घाटकांच्या नवांची यादी फेटाळली, हे विशेष.त्यामुळे आता संमेलनाची घटिका जवळ येऊन ठेपलेली असताना उद्घाटकाचा थांगपत्ता नाही. तर ज्यांच्या आज्ञेत राहूनच संमेलनाचे आयोजन होत आहे, ते महामंडळ अध्यक्ष राजीनामा देऊन वर्तुळाबाहेर गेले आहेत. त्यामुळे यवतमाळ येथे शुक्रवारी सुरू होणाºया अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेत उद्घाटक म्हणून ख्यातकीर्त लेखिका नयनतारा सहगल यांचा उल्लेख करण्यात आला. तत्पूर्वीच मोठा खल करून महामंडळ आणि स्थानिक अयोजकांनी मिळून त्यांना रितसर निमंत्रण धाडले होते. पण नयनतारा सहगल यांचे नियोजित लेखी भाषण पाहून महामंडळाची पाचावर धारण बसली. अन् लगेच ईमेल पाठूवन सहगल यांना ‘तुम्ही येऊ नका’ असा तुसडा निरोप देण्यात आला. या प्रकाराने अवघ्या देशातील संवेदनशीन साहित्यिकांनी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी आणि यवतमाळच्या स्थानिक आयोजकांवर टीकेची झोड उठवली. हा प्रकार सरकारच्या दबावानेच झाल्याचा आरोप करीत माजी मंत्री वसंतराव पुरके, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीचे देवानंद पवार आदींनी मुख्यमंत्र्यांनीच माफी मागण्याची मागणी रेटली. आपल्या चुकांचे निरसण करण्याऐवजी डॉ. श्रीपाद जोशी यांनी बुधवारी सकाळी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. प्रज्ञावंत उद्घाटकाचे निमंत्रण रद्द केल्याच्या बालंटातून त्यांनी स्वत:ची मान सोडवून घेतली. मात्र, जाता-जाताही शेवटचा निर्णय घेतानाही ‘मी म्हणेल तीच पूर्व दिशा’ हा प्रकार केलाच. यवतमाळच्या आयोजन समितीने सोमवारी संमेलनासाठी नवा उद्घाटक निश्चित करण्याचा प्रस्ताव जोशी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला. त्यात काही नावेही सुचविली. ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार, ख्यातनाम साहित्यिक लोकमत नागपूरचे संपादक सुरेश द्वादशीवार, कविवर्य विठ्ठल वाघ, शेगाव संस्थानचे शिवशंकरभाऊ पाटील ही नावे जोशींपुढे ठेवण्यात आली. यापैकी तुम्ही म्हणाल त्याच मान्यवराचे नाव उद्घाटक म्हणून जाहीर करू, अशी भूमिकाही मांडण्यात आली. मात्र, जोशी यांनी सोमवार-मंगळवार असे दोन दिवस त्याबाबत निर्णयच कळवला नाही. तर बुधवारी स्वत: राजीनामा देण्यापूर्वी ही सर्वच्या सर्व नावे फेटाळल्याचे महामंडळाने यवतमाळच्या आयोजकांना कळविले. त्यामुळे आयोजक चांगलेच कात्रीत सापडले आहेत. ज्यांनी संमेलनाची सारी सुत्रे सुरवातीपासून स्वत:च्याच ‘कह्यात’ ठेवली, ते महामंडळ अध्यक्षच आता नाहीत, त्यामुळे पुढला कारभार कोणाच्या ‘हुकमांवरून’ करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यवतमाळात पुतळा जाळलादरम्यान, साहित्य संमेलनाच्या सोहळ्याआडून महामंडळ आणि स्थानिक आयोजकांनी यवतमाळ जिल्ह्याच्या आतिथ्यशीलतेचा अवमान केला. जिल्ह्याची नाचक्की केली. या कारणावरून संभाजी ब्रिगेड व पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी यवतमाळात निषेध नोंदविला. संभाजी ब्रिगेडने जोशी आणि कोलते यांचा पुतळा जाळून संताप नोंदविला. विचारांची एकजुट झाल्यानेच श्रीपाद जोशी यांच्या अहंकाराचा पाडाव झाल्याची प्रतिक्रिया शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे देवानंद पवार यांनी नोंदविली. आज महामंडळाची बैठकसाहित्य संमेलन दोन दिवसांवर आलेले उद्घाटकाचे नाव निश्चित झालेले नाही. आयोजकांनी सुचविलेली नावे फेटाळून महामंडळ अध्यक्षांनी स्वत:ही राजीनामा दिल्याने पेच वाढला आहे. आता गुरुवारी साहित्य महामंडळाच्या पदाधिका-यांची बैठक होत आहे. त्यात महामंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार सोपविणे, तसेच संमेलनासाठी नव्या उद्घाटकाचे नाव निश्चित होणार असल्याचे संमेलनाचे कार्यवाह प्रा. घनश्याम दरणे यांनी सांगितले.
साहित्य संमेलनाचे त्रांगडे : जाता-जाताही जोशींनी फेटाळली नवी यादी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2019 8:03 PM