लोकमत न्यूज नेटवर्कअविनाश साबापुरेयवतमाळ : सरस्वतीचे साधक, देशभरातील गणमान्य लेखक ताजेतवाने चेहरे घेऊन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य मांडवात बोलत होते, ऐकत होते. त्याच मांडवाच्या दारात शे-दोनशे कष्टाचे पाईक मात्र मजुरीविना तळमळत होते. आशाळभूत नजरेने साहित्यिकांच्या गर्दीकडे पाहात होते. गर्दीवर फिरून आलेली नजर पुन्हा शून्यात बुडत होती. आजचा दिवस कसा लोटायचा, हा सवाल मात्र साहित्याच्या सोहळ्यातूनही सुटू शकला नाही...प्रसंग होता साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचा. पण प्रश्न होता दोनशे मजुरांच्या लिलावाचा.. हाताला काम मिळण्याच्या प्रतिक्षेचा. यवतमाळात शुक्रवारपासून जिथे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा उरूस भरला, त्याच जत्रेच्या पुढे दररोज मजुरांचा लिलाव होतो. पण शुक्रवारी साहित्य संमेलनासाठी रस्त्यांवरची वाहतूक वळविण्यात आली. त्यातच पूनम चौकात होणारा मजुरांचा लिलावही रोखण्यात आला.क्रिकेटच्या आयपीएलसाठी जसा खेळाडूंचा कोट्यवधी रूपयांत लिलाव होतो, तसाच यवतमाळात दररोज मजुरांचा ठेकेदारांकडून हर्रास होतो. गेल्या १५ वर्षांपासून पुनम चौकात हा रतीब सुरू आहे. २५-३० ठेकेदार हा लिलाव करतात. त्यातून २०० पेक्षा अधिक मजुरांना दिवसभराचे काम मिळते. पण शुक्रवारी साहित्य संमेलनाच्या भाऊगर्दीत हा लिलावच झाला नाही. शुक्रवारी पहाटेच पुनम चौकात रोजच्या प्रमाणे मजुरांची गर्दी लिलावासाठी जमली. त्याचवेळी प्रतिभावंत साहित्यिकांचीही वर्दळ वाढली. पोलिसांचा बंदोबस्त होता, वाहतूक रोखण्यात आली अन् मजुरांचा लिलाव झालाच नाही. सारस्वतांच्या मांडवात भाषेचा सोहळा मांडवाच्या दारात भाकरीचा शोध असा विरोधाभास निर्माण झाला होता.आमचा रोज कोण देणार?दिनेश रेड्डी, जनार्दन भगत, संजय शेलारे, अमोल कवाडे, हरिदास राडरी, सुधाकर सोनटक्के, क्रिष्णा पानतनवार, गजानन गुरनुले शेकडो मजुरांची गर्दी संमेलनाच्या प्रवेशद्वाराजवळच ठेकेदार येतील आणि आपल्याला कामासाठी नेतील म्हणून ताटकळत होती. नंतर त्यांना कळले आज लिलाव होणारच नाही. हे संमेलन तीन दिवस हाये. मंग तीन दिवस जर आमची हरार्सी झाली नाई तं आमचा रोज कोण देणार? हा मजुरांचा आर्त सवाल मात्र संमेलनातही अनुत्तरित राहिला.
९२ वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन; सधन साहित्यिकांसाठी रोखले गरिबांच्या रोजगाराचे साधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 12:44 PM
सरस्वतीचे साधक, देशभरातील गणमान्य लेखक ताजेतवाने चेहरे घेऊन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य मांडवात बोलत होते, ऐकत होते. त्याच मांडवाच्या दारात शे-दोनशे कष्टाचे पाईक मात्र मजुरीविना तळमळत होते.
ठळक मुद्दे२०० मजुरांचा तीन दिवस वांदा सारस्वतांच्या दारात अडला माणसांचा लिलाव