आज तोफा थंडावणार : गावागावांत मंत्री, खासदार-आमदारांच्या भेटी यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या ५५ जागांची प्रचार मोहीम अंतिम टप्प्यात आली आहे. प्रत्येक उमेदवार आणि पक्षनेते जीवाचे रान करून मतांचे दान मागताना फिरत आहेत. मंगळवारी रात्री १० वाजता जाहीर प्रचार बंद होणार असल्याने मंत्री, खासदार, आमदार यांच्या मॅराथॉन सभा गावागावात होताना दिसत आहे. पक्षातील नेत्यांनी एकतरी सभा आपल्या गटात घ्यावी, यासाठी उमेदवारांकडून आटापिटा सुरू आहे. गावातील मॅराथॉन सभेला गर्दी जमविण्याचे आव्हान उमेदवारासह पक्ष कार्यकर्त्यांपुढे आहे. त्यामुळे माहोल कमी दिसू नये यासाठी मंत्री, खासदार, आमदार अपल्याच वाहन ताफ्यात किमान ५० कार्यकर्त्यांची फौज घेऊन फिरत आहे. सभास्थळी गर्दी जमल्याचे दृश्य यातून तयार होते. शिवाय सोबत आणलेल्या शाल, श्रीफळ आणि हारांचा उपयोग स्वत:च्याच स्वागतासाठी करत आहे. ऐनवेळेवर हारासाठी कार्यकर्त्यांची धावपळ नको म्हणून नेत्यांनी ही सोय केली आहे. शिवसेनेने तर सभा आयोजित असलेल्या गावामध्ये एक तास अगोदर कलापथकाद्वारे गर्दी जमविण्याचा फंडा वापरणे सुरू केले आहे. विशेष म्हणजे, त्याला चांगला प्रतिसाद ग्रामीण भागात मिळत आहे. चार सदस्य असलेल्या या कलापथकाकडून गावातील प्रमुख चौकात, मंदिर परिसरात राजकीय प्रवचन केले जाते. मनोरंजनात्मक शैलीत सादरीकरण असल्याने याला बऱ्यापैकी गर्दी जमते. ही गर्दी जमली की, लगेच नेत्यांची एंट्री होते आणि सभेला सुरूवात केली जाते. तोपर्यंत हे पथक पुढच्या गावात हाच प्रयोग करते. अशा पद्धतीने मजल दर मजल करत या मॅरेथॉन सभा होत आहे. राळेगाव तालुक्यातील जोडमोहा- डोंगरखर्डा गटात एका भाजपा नेत्याने पक्षाच्या उमेदवारासाठी सभा घेतली. या सभेला वाजंत्री सोडले, तर मोजून वीस-पंचवीस नागरिक उपस्थित होते. त्यामुळे संतापलेल्या या नेत्याने पक्षाच्या स्थानिक लोकप्रतिनिधींची चांगलीच खरडपट्टी काढली. नेत्यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने प्रत्येक गावात पोहोचण्याची धडपड आहे. ३०० ते ५०० उंबरठ्याच्या गावातही कार्यकर्त्यांना फिरण्यासाठी चारचाकी वाहनाची व्यवस्था केली जात आहे. त्यामुळे आज प्रवाशी वाहन मिळण्याची सोय नाही. या प्रचारातील कार्यकर्त्यांसाठी आता रस्त्यावरच्या शेतात जेवणावळी आयोजित केल्या जात आहे. मतदानाच्या शेवटच्या मिनिटापर्यंत येथील चूल विझता कामा नये, अशी तंबीच काही उमेदवारांनी दिली आहे. येथे आलेल्या प्रत्येकाचे आवभगत केले जात आहे. कार्यकर्त्यांची एनर्जी टिकविण्यासाठी ‘खास’ व्यवस्था आहे. आता गावातील रखडलेल्या धार्मिकस्थळाचे बांधकाम, एखाद्या मंडळाला साहित्य अशाही वस्तू भेटस्वरूपात दिल्या जात आहे. त्यासाठी निवडणूक विभागाचा डोळा चुकवून तालुका व जिल्हा मुख्यालयी खास व्यवस्था केली आहे. जाहीर प्रचार संपल्यानंतर गठ्ठा मतांची आकडेमोड केली जाणार आहे. त्यासाठी सरळ-सरळ रोखीचा व्यवहार होण्याची चिन्हे आहेत. (कार्यालय प्रतिनिधी) दुसरा टप्पा : सहा गट, ३४ उमेदवार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या नामांकन मागे घेण्याचा सोमवार शेवटचा दिवस होता. सहा गटासाठी ३४ उमेदवार जिल्हा परिषदेच्या रिंगणात आहे. तर पंचायत समितीच्या १२ गणात ६५ उमेदवार आहेत. जिल्हा परिषदेतून २८ जणांनी तर पंचायत समितीतून ३१ उमेदवारांनी माघार घेतली. चिन्ह वाटप झाल्यानंतर येथे जाहीर प्रचार सुरू होईल. २१ फेब्रुवारीला या जागांसाठी मतदान होत आहे. मतदानासाठी एकच ईव्हीएमपंचायत समिती व जिल्हा परिषद अशी दोन मते द्यावयाची असली, तरी एकच ईव्हीएम मशिन राहणार आहे. उमेदवारांच्या संख्येनुसार बॅलेट युनिट वाढणार आहे. एका बॅलेट युनिटमध्ये १६ उमेदवार बसतात. त्यापुढील उमेदवारांसाठी अतिरिक्त बॅलेट युनिट वापरण्यात येईल. गट आणि गणांसाठी मतदान केल्यानंतरच मत पडल्याची बीप वाजणार आहे.
हारतुरे घेऊन मॅराथॉन सभा
By admin | Published: February 14, 2017 1:34 AM