फलित नाही : जिल्हा परिषदेतील कृषी साहित्य खरेदी वांद्यातयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केलेली साहित्य खरेदी वांद्यात सापडली आहे. यासाठी नियुक्त चौकशी समितीची शुक्रवारी मॅराथॉन बैठक झाली. मात्र तूर्तास या बैठकीतून काहीच निष्पन्न झाले नाही.कृषी विभागाने गेल्या वर्षांत शेतीसंबंधी विविध साहित्याची खरेदी केली. मात्र या खरेदीत अनियमितता झाली असून भलत्याच पुरवठादारांकडून साहित्य खरेदी करण्यात आल्याचा काही सदस्यांचा आरोप आहे. यासंबंधी त्यांनी तक्रारीही केल्या आहेत. या तक्रारीनंतर जिल्हा परिषदेने स्थायी समिती सभेत या गौडबंगालाची चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना केली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ.आरती फुपाटे या समितीच्या अध्यक्ष आहेत. समितीत उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, राहुल ठाकरे, अमन गावंडे, दिवाकर राठोड आदींचा समावेश आहे. शुक्रवारी सायंकाळी उपाध्यक्ष मांगुळकर यांच्या अध्यक्षतेत स्थायी समिती सभागृहात समितीची बैठक सुरू झाली. बैठकीला प्रवीण देशमुख, राहुल ठाकरे, दिवाकर राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भुयार, देशमुख, कृषी विकास अधिकारी जगन राठोड आदी उपस्थित होते. यावेळी विविध दस्तावेजाची तपासणी करण्यात आली. कृषी साहित्य खरेदीत नेमकी कशी अनियमितता झाली, कृषी विभागाला कसा फटका बसला, यावर चर्चा झाली. मात्र अंतिमत: बैठकीतून काहीच निष्पन्न झाले नाही. ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. (शहर प्रतिनिधी)समितीच्या वैधतेवर प्रश्नचिन्हबैठकीत समितीच्या वैधतेवरच जगन राठोड यांनी प्रश्न उपस्थित केला. अशी समितीच नेमण्यात येऊ शकत नाही, असा दावा त्यांनी केला. तसेच तक्रारदारांना समितीत राहता येते का, असा प्रश्नही केला. काही समिती सदस्यांनीही हा मुद्दा उचलला. यानंतर राठोड यांना बैठकीतून बाहेर जाण्यास सांगण्यात आले, असे खुद्ध राठोड यांनीच सांगितले. त्यामुळे या समितीच्या निष्कर्षाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीत उभी फूटकृषी विकास अधिकाऱ्यांच्या मुद्यावरून जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांमध्येच उभी फूट असल्याचे दिसून येत आहे. या दोन्ही पक्षांचे काही पदाधिकारी व सदस्य परस्पर विरोधी भूमिका बजावत आहे. काही सदस्य, पदाधिकारी राठोड यांच्या बाजूने, तर काही विरूद्ध बाजूने दिसत असल्याने या संपूर्ण प्रकरणी नेमके कोण खरे व कोण खोटे, असा प्रश्न चर्चीला जात आहे.
चौकशी समितीची मॅरॉथान बैठक
By admin | Published: August 28, 2016 12:07 AM