यवतमाळ : अभियोग्यता परीक्षेला पाच महिन्यांचा कालावधी लोटूनही सरकारने पवित्र पोर्टल सुरू केलेले नाही. शिक्षक भरतीच्या काहीही हालचाली दिसत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या डीएड, बीएडधारक बेरोजगारांनी सोमवारी यवतमाळात महाआक्रोश मोर्चा काढला. ‘आओ गुरू करे पवित्र पोर्टल शुरू’ असे नारे देत या युवक-युवतींनी जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून सोडला. ऐन गुरुपौर्णिमेच्याच दिवशी भावी गुरुजींना नोकरीसाठी मोर्चा काढावा लागल्याने जनमानसात संताप व्यक्त होत होता.
सोमवारी सकाळी ११ वाजता येथील शिवाजी मैदानात डीएड, बीएडधारक बेरोजगार युवक-युवती एकत्र आले. त्यानंतर मोर्चाला सुरूवात झाली. हा मोर्चा शिवाजी मैदान ते आर्णी मार्ग असा फिरत दुपारी जिल्हा परिषद कार्यालयावर धडकला. ‘नोकरी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची’, ‘खूप झाल्या गप्पा आता ५५ हजार शिक्षक भरतीचा एकच टप्पा’, ‘शिक्षक भरती करा, नाही तर खुर्च्या खाली करा’ अशा घोषणा करत हा मोर्चा निघाला. यवतमाळसह हिंगोली, अहमदनगर, चंद्रपूर, जालना, गडचिरोली, बीड अशा विविध जिल्ह्यातून यावेळी बेरोजगार तरुण या मोर्चासाठी यवतमाळात एकवटले होते. यामध्ये महिला बेरोजगार उमेदवारांचीही मोठी संख्या होती. विशेष म्हणजे काही महिला तर आपल्या तान्ह्या बाळाला कडेवर घेऊन मोर्चात सहभागी झाल्या होत्या.
मोर्चा जिल्हा परिषदेपुढे पोहोचल्यावर प्रचंड घोषणाबाजी करत प्रशासनाच्या माध्यमातून राज्य शासनाला मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले. एकाच टप्प्यात ५५ हजार शिक्षक पदे भरण्यात यावी, त्यासाठी तातडीने पवित्र पोर्टल सुरू करण्यात यावे, विविध परीक्षांसाठी घेतले जाणारे अव्वाच्या सव्वा शुल्क कमी करण्यात यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. येथील प्रशांत मोटघरे, सचिन राऊत यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
किती वेळा सिद्ध करायची पात्रता?
आम्ही २०१७ मध्ये शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता परीक्षा दिली. त्यानंतर २०२३ मध्येही अभियोग्यता परीक्षा दिली. दोन दोन वेळा आमची पात्रता सिद्ध झालेली असतानाही सरकार अजूनही शिक्षक भरती करण्यासाठी तयार नाही. त्यामुळे नेमक्या किती परीक्षा पास झाल्यावर आम्ही शिक्षकाच्या नोकरीसाठी पात्र ठरणार आहोत, असा संतप्त सवाल यावेळी महाराष्ट्रभरातून आलेल्या अभियोग्यताधारकांनी उपस्थित केला.