लोकमत न्यूज नेटवर्कवणी : मारेगाव व झरी तालुक्यात शिक्षणाचा अक्षरश: बट्ट्याबोळ झाला असून अनेक शाळांना रिक्त पदाचे ग्रहण लागले आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असून काही शाळांचा गाडा रोजंदारी शिक्षकांवर सुरू असल्याचे भयावह चित्र या दोन तालुक्यात पाहावयास मिळते.वणी तालुक्यातही अनेक शाळात शिक्षकांची रिक्त पदे आहेत. गेल्या काही वर्षांपासून शिक्षकांची भरतीच होत नसल्याने व निवृत्तीचे प्रमाण वाढल्याने रिक्त पदे वाढली आहे. मारेगाव तालुक्यात एकुण १०५ शाळा आहेत. या शाळांसाठी ३३३ शिक्षकांची पदे मंजूर आहेत. मात्र प्रत्यक्षात २७१ शिक्षक अध्यापनाचे कार्य करित आहेत. या तालुक्यात शिक्षकांची ६२ पदे रिक्त आहे. ती भरण्यासाठी अनेकदा पाठपुरावा करण्यात आला. परंतु ही पदे भरण्यात आली नाही. अलिकडेच मार्डी पंचायत समिती गणातील कोथुर्ला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्थायी शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. वारंवार मागणी करूनही शिक्षक मिळत नाही म्हणून पालकांनी शाळेला कुलूप ठोकून पंचायत समितीमध्ये शाळा भरविली होती. दरम्यान, मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी मारेगावचे गटविकास अधिकारी तलवारे यांची भेट घेऊन ही समस्या निकाली काढण्याची विनंती केली. त्यावर तलवारे यांनी लवकरच समायोजनाने रिक्त पदे भरली जातील, असे आश्वासन दिले. या तालुक्यात सात शाळा विनाशिक्षकी आहेत. याठिकाणी रोजंदारीवर शिक्षक पाठविले जातात. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असले तरी शासनाला त्याचे कोणतेही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.झरी तालुक्यात तर यापेक्षाही बिकट परिस्थिती आहे. या तालुक्यात ११६ शाळा असून शिक्षकांची ३६५ पदे मंजूर आहेत. तब्बल ५७ शिक्षकांची पदे या तालुक्यात रिक्त आहेत. विशेष म्हणजे झरी तालुका हा अतिशय दुर्गम असल्याने याठिकाणी मुख्यालयी राहत नाही. पांढरकवडा अथवा वणी येथे वास्तव्याला राहून हे शिक्षक अध्यापनाचे कार्य करित आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. वणी तालुक्यात ५११ शिक्षकांची पदे मंजूर आहेत, मात्र त्यापैकी ४८० शिक्षक कार्यरत आहेत. शिक्षकांची ३१ पदे येथे रिक्त आहेत. एक ते आठपर्यंतच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या आठ हजार ३६८ आहे.लोकप्रतिनिधींची उदासीन भूमिका कारणीभूतएकीकडे मारेगाव, झरी या आदिवासीबहुल तालुक्यात शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू असताना दुसरीकडे लोकप्रतिनिधी याबाबत उदासीन असल्याचा आरोप मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी केला आहे. परिस्थितीत सुधारणा न झाल्यास शैक्षणिक नुकसान सोसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हातून लोकप्रतिनिधींचा सत्कार करू, असेही उंबरकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
मारेगाव, झरीत शिक्षणाचा बट्ट्याबोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 10:25 PM
मारेगाव व झरी तालुक्यात शिक्षणाचा अक्षरश: बट्ट्याबोळ झाला असून अनेक शाळांना रिक्त पदाचे ग्रहण लागले आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असून काही शाळांचा गाडा रोजंदारी शिक्षकांवर सुरू असल्याचे भयावह चित्र या दोन तालुक्यात पाहावयास मिळते.
ठळक मुद्देवणीतही रिक्त पदे : रोजंदारी शिक्षकांवर विद्यार्थ्यांचे भवितव्य