यवतमाळात दोन गट : सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व मोडित काढण्यासाठी व्यूहरचनायवतमाळ : यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. १८ जागांसाठी निवडणूक होत असून ४७ उमेदवार रिंगणात आहेत. यात दोन गटांमध्ये अस्तित्वाची लढाई होणार आहे.जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या या बाजार समितीवरील वर्चस्वासाठी विविध पक्ष आणि गट उत्सुक असतात. येथील बाजार समिती जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत बाजार समिती आहे. परिणामी समितीवर वर्चस्व प्राप्त करण्यासाठी सर्वच गट, पक्ष कंबर कसून प्रचाराच्या रणधुमाळीत सहभागी झाले आहेत. गेल्या १२ वर्षांपासून बाजार समितीवर भाजपाप्रणीत सूर्यकांत गाडे यांच्या गटाचे वर्चस्व आहे. ते मोडीत काढण्यासाठी यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेतृत्वातील परिवर्तन शेतकरी आघाडीने कंबर कसली आहे.गाडे यांचे बाजार समितीवरील वर्चस्व मोडीत काढण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने पॅनल मैदानात उतरविल्याने चुरशीचा सामना होण्याची शक्यता आहे. सुरूवातीला १९ संचालक पदांसाठी तब्बल १0७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. उमेदवारी मागे घेतल्यानंतर आता १८ जागांसाठी ४७ उमेदवार रिंगणात उरले आहेत. यात सर्वाधिक ११ संचालक सहकारी संस्था मतदार गटातून, ग्रामपंचायत मतदार संघातून चार, व्यापारी व अडते गटातून दोन, हमाल व मापारी गटातून एक आणि पणन-प्रक्रिया गटातून एक उमेदवार निवडून द्यावयाचा आहे.यापैकी पणन प्रक्रिया गटातून परिवर्तन शेतकरी आघाडीचे राधेश्याम फुलचंद अग्रवाल यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर झाला आहे. आता सूर्यकांत गाडे व बाळासाहेब मांगुळकर यांच्या नेतृत्वातील दोन पॅनलमध्ये काट्याची लढत होणार आहे. यात काही अपक्षही रिंगणात आहे. (शहर प्रतिनिधी)
बाजार समितीच्या प्रचाराची रणधुमाळी
By admin | Published: September 24, 2016 2:39 AM