लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बाजार समित्यांमध्ये दर दिवसाला १० ते १२ कोटींच्या घरात शेतमालाची उलाढाल होते. शेतमालाचे हे दर ‘एनसीडीएक्स’च्या जाहीर झालेल्या दरानुसार ठरतात. यानंतर १०:२:२ या नियमानुसार शेतमालाची खरेदी केली जाते.
जिल्ह्यातील बाजार समितीचे दर ‘एनसीडीएक्स’च्या दरावर ठरतात. यानुसार प्लँटही व्यापाऱ्यांना किती शेतमाल खरेदी करायचा याच्या सूचना देते. त्यानुसार दरांचा मॅसेज व्यापाऱ्यांकडे वळता होतो. जाहीर झालेल्या दरावर शेतमालाचे दर घोषित होतात आणि हर्रास पद्धतीने शेतमालाची बोली लावली जाते.
यामध्ये बोली लावताना व्यापारी एक रुपयानुसार वाढीव दर सांगतात. सरतेशेवटी ज्या व्यापाऱ्यांनी सर्वाधिक वाढीव दर जाहीर केले, त्याला बाजारातील शेतमाल दिला जातो.
सध्या सोयाबीनचे हमी दर ३८८० आहे. खुल्या बाजारातील सोयाबीनचे दर ४२०० रुपयांपर्यंत पोहोचलेले आहे, तर डाग लागलेला आणि पावसामुळे खराब झालेला शेतमाल तीन हजार रुपयांपासून खरेदी होतो. हरभऱ्यामध्ये याच्या विरुद्ध स्थिती आहे. हरभऱ्याचे हमी दर पाच हजार रुपये क्विंटलचे आहे. खासगी व्यापाऱ्यांचे दर ४२०० रुपये आहे. ‘एनसीडीएक्स’मुळे हे दर कमी झाले आहेत. मुंबई आणि दिल्लीवरून ‘एनसीडीएक्स’ दर नियंत्रित करतात. त्यांनी जाहीर केलेल्या दरावरच खालचे दर ठरतात. कापसामध्ये खुल्या बाजारात मोठी घसरण झाली आहे. ४१ हजार रुपयांची कापूस गाठ ४० हजार ५०० पर्यंत खाली आहे, तर सरकीच्या ढेपेचे दर २३०० रुपयांवरून दोन हजारांपर्यंत खाली आले आहे. यातून कापसाचे दर ५३०० रुपयांवर आहे. यामध्ये हमी दराच्या तुलनेत ५०० रुपयांची घट आहे.
कापूस
यवतमाळ बाजार समिती सर्वात मोठी बाजार समिती आहे. याठिकाणी दरदिवसाला २०० कापूस गाड्या पणन महासंघाकडे विक्रीसाठी जात आहेत. तर १०० गाड्या खासगी व्यापाऱ्यांकडे कापूस विक्रीसाठी जात आहेत. खासगी व्यापाऱ्यांनी कापसाचे दर आधारभूत किमतीखाली ठेवले आहे. ५८२५ रुपये क्विंटलचा हमी दर आहे, तर खुल्या बाजारात ५२०० रुपये क्विंटलपर्यंत कापसाचा दर आहे.
सोयाबीन
बाजार समितीमध्ये दोन हजार क्विंटल सोयाबीनची उलाढाल होत आहे, तर खासगी बाजार समितीमध्ये दोन हजार इतकीच पोत्यांची आवक होत आहे. यवतमाळच्या बाजारपेठेत दर दिवसाला सोयाबीन खरेदीमध्ये तीन कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. याशिवाय पावसाने भिजलेले सोयाबीन हमी दराच्या खाली खरेदी होताना पाहायला मिळत आहे. या सोयाबीनला मागणी नाही.
हरभरा
यवतमाळच्या बाजारामध्ये दरदिवसाला १०० क्विंटल हरभऱ्याची आवक आहे, तर खासगी बाजार समितीमध्ये ५० क्विंटल हरभऱ्याची आवक होत आहे. दर दिवसाला १२ लाख रुपयांची उलाढाल हरभरा खरेदीमध्ये होत आहे. काही दिवसांपूर्वी हरभऱ्याचे दर साडेपाच हजार रुपये क्विंटल होते, आता या दरामध्ये घसरण झाली आहे. हे दर ४२०० रुपये क्विंटलपर्यंत खाली घसरलेले आहेत.
बाजार समित्यांमध्ये १२ वाजता ऑनलाईन पद्धतीने बाजार दर जाहीर होतात. यानंतर १२.३० वाजता बाजार सुरू होतो. कुठे काय भाव आहेत हे माहिती पडते. यानंतर जर शेतकऱ्याने कमी दर मिळाल्याची तक्रार केली तर बाजार समिती हस्तक्षेप करून शेतकऱ्याला न्याय मिळवून देते.
- रवींद्र ढोक, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, यवतमाळ
शेतमालाचे दर खर्चावर आधारित असेच जाहीर होणे अपेक्षित आहे. सध्या हमी दर जाहीर होतात ते देखील खर्चावर आधारित नाही. कारण मजुरीचे दर प्रचंड वाढले आहे. अशा स्थितीत खुल्या बाजारात मिळणारे दर फार कमी आहे. यामुळे शेती व्यवसाय घाट्यात येत आहे.
- अविनाश राऊत, शेतकरी
सध्याच्या स्थितीत शेतीचे उत्पन्न प्रचंड घटले आहे. अशा परिस्थितीत शेतमालास मिळणारे दर फार कमी आहेत. बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी नेल्यावर व्यापारी साखळी पद्धतीने दर वर चढू देत नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पाहिजे तसे पैसे पडत नाहीत.
- विजय कदम, शेतकरी