महागाव (यवतमाळ) : तालुक्यातील वाघनाथ येथे एका विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. मात्र, तिच्या माहेरच्यांनी ही आत्महत्या नसून सासरकडील मंडळींनी तिचा खून केल्याची तक्रार दाखल केली आहे.
वेणूताई अशिष पानपट्टे (३०) असे मृत महिलेचे नाव आहे. धारमोहा येथील वेणूताई पंजाब ठाकरे हिचा विवाह वाघनाथ येथील आशिष खुशाल पानपट्टे यांच्यासोबत ३ मे २०१३ रोजी झाला होता. या दाम्पत्यास दोन मुले आहेत. सुरुवातीचे काही दिवस सुखात गेल्यानंतर पती आशिष, सासू रंजना, सासरे खुशाल, दीर आप्पाराव, जाऊ शुभांगी आणि नणंद निलूबाई अंबोरे यांनी संगनमताने वेणूताईचा हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप आहे. अनेकदा सासरच्यांनी तिला मारहाण केली.
पती आशिषने वेणूताईला मारहाण करून १ ऑगस्ट २०२२ रोजी माहेरी आणून सोडले होते. माहेरून दोन लाख रुपये आणण्याचा तगादा त्याने लावला होता. तिने अनेकदा छळाची माहिती आई, वडील व भावांना दिली. मात्र, परिस्थिती पूर्ववत होईल, या आशेने माहेरचे तिची समजूत काढत होते. मंगळवारी सायंकाळी वेणूताईने फाशी घेतल्याचा निरोप फोनवरून मिळाल्यानंतर माहेरची मंडळी वाघनाथ येथे धडकली. तोपर्यंत तिचा मृतदेह सवना ग्रामीण रुग्णालयात हलविला होता. तेथून सर्वजण मृतदेह बेवारस सोडून निघूनही गेले.
मृत वेणूताईचा भाऊ ओमकार ठाकरे यांनी महागाव ठाण्यात तक्रार दिली. परंतु पोलिसांनी ती दाखल करून घेण्यास रात्र घालवली. वेणूताईच्या दोन्ही दंडावर, बरगड्यांवर आणि कानशिलावर मारहाणीमुळे काळे, निळे व्रण उमटलेले दिसत असून, तिचा सासरच्यांनी फाशी देऊन खून केला व आत्महत्येचा बनाव केल्याचा आरोप तिचा भाऊ ओमकार पंजाब ठाकरे यांनी तक्रारीतून केला आहे.
वेणूताईचा मृत्यू संशयास्पद
वेणूताईने घरातच गळफास घेतल्याचा बनाव सासरची मंडळी करीत आहेत. माहेरचे लोक येण्यापूर्वी गळफास काढून मृतदेह रुग्णालयात का नेण्यात आला, हे कोडेच आहे. सवना येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेह ठेवून सासरचे लोक फरार झाल्याने संशय वाढला आहे. मृताच्या अंगावर मारहाणीचे व्रण आहेत. त्यामुळे वेणूताईच्या मृतदेहाचे इनकॅमेरा पोस्टमार्टेम करण्यात यावे, अशी मागणी आई-वडिलांनी केली. नंतर मृतदेह सवना रुग्णालयातून यवतमाळ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. पोलिसांची कार्यप्रणाली रात्रीपासूनच संशयास्पद वाटत असून, येथे न्याय मिळणार नसल्याने यवतमाळ येथे शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती नातेवाईक प्रभू शिंदे यांनी दिली.