मार्डी (यवतमाळ) : दोन महिन्यापूर्वी पतीचा मृत्यू झाला. त्यातून आलेल्या नैराश्यानंतर आपल्या चिमुकलीला घेऊन ती माहेरी आली. पती निधनानंतर आलेल्या एकाकीपणामुळे विमनस्क अवस्थेत असलेल्या या मातेने अखेर चिमुकलीसह गळफास लावला. यात आईचा मृत्यू झाला, तर नऊ महिन्याची चिमुरडी सुदैवाने बचावली. ही हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी मारेगाव तालुक्यातील मार्डी येथे घडली.
रोशनी आशिष झाडे (२४) असे मृत आईचे नाव असून या दुर्घटनेत बचावलेल्या बालिकेचे नाव काव्या असे आहे. मार्डी येथील रहिवासी जीवन वैद्य यांची मुलगी रोशनी हिचा विवाह दोन वर्षांपूर्वी हिंगणघाट तालुक्यातील शेकापूर येथील आशिष झाडे या युवकाशी झाला होता. संसाराचा गाडा सुस्थितीत पुढे जात असतानाच एक मोठा आघात झाला. रोशनीचा पती आशिष झाडे याचे अचानक निधन झाले. या घटनेनंतर चिमुरडीला सांभाळण्याची जबाबदारी आणि पती निधनानंतर आलेले एकाकीपण यातून ती माहेरी मार्डी येथे आईवडिलांकडे राहायला आली होती.
गेल्या काही दिवसांपासून ती नैराश्येच्या गर्तेत होती. मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास रोशनीने राहत्या घरी सिलींग फॅनला साडीच्या साह्याने चिमुकलीसह स्वत:च्या गळ्याला फास लावला. मात्र चिमुकल्या काव्याच्या गळ्याचा फास सुटला आणि ती खाली पडली. रोशनीचा मात्र फास लागून मृत्यू झाला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. चिमुकल्या नऊ महिन्याच्या काव्याला वणी येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. दरम्यान, घटनास्थळी एसडीपीओ संजय पुज्जलवार, मारेगावचे ठाणेदार राजेश पुरी यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.