- प्रकाश लामणे
पुसद (यवतमाळ) : तालुक्यातील बेलोरा येथील दहावीच्या परीक्षा केंद्रावर बुधवारी सामूहिक कॉपीचा प्रकार आढळून आला. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात पथकाने या केंद्रावर धाड टाकली असता हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी संबंधित केंद्र संचालकांसह १३ कर्मचाऱ्यांवर कारवाई प्रस्तावित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तालुक्यातील बेलोरा येथील शिवाजी विद्यालयात दहावीचे परीक्षा केंद्र आहे. या परीक्षा केंद्रावरून २५१ विद्यार्थी दहावीची परीक्षा देत आहे. बुधवारी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेदरम्यान भूमितीचा पेपर होता. पेपर सुरू झाल्यानंतर १२.३० वाजेच्या सुमारास उपविभागीय अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या नेतृत्वातील भरारी पथकाने केंद्रावर धाड टाकली. पथकातील सदस्य केंद्रातील ११ खोल्यांमध्ये शिरले. त्यावेळी वर्गामध्ये सामूहिक कॉपीचा प्रकार आढळल्याचे एसडीओंनी सांगितले.
या केंद्राबाहेर कॉपी देणाऱ्यांचीही मोठी गर्दी होती. बाहेरून कॉपी देण्यासाठी अनेजण दाखल झाले होते. केंद्राशेजारी एक झेरॉक्स सेंटरही आहे. त्या सेंटरमध्येही पथकाला काही कॉप्या आढळल्या. त्यामुळे पथकाने झेरॉक्स सेंटरमधील कॉम्प्युटर, स्कॅनर केंद्रात आणून जप्त केले. या केंद्रावर केंद्र संचालक म्हणून तेथीलच मुख्याध्यापक पंडितराव मस्के कार्यरत आहे. त्यांच्यासह ११ खोल्यांवर ११ पर्यवेक्षक आणि एक उपकेंद्र संचालक आहे. या सर्व १३ कर्मचाऱ्यांवर कारवाई प्रस्तावित करण्याचे आदेश एसडीओंनी गटशिक्षणाधिकारी संजय कांबळे यांना दिले. त्यानुसार परीक्षा मंडळाकडे कारवाई प्रस्तावित करणार असल्याचे संजय कांबळे यांनी सांगितले.