आर्त याचना : उमरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे ग्रामदेवतांना साकडे दत्तात्रेय देशमुख । लोकमत न्यूज नेटवर्क उमरखेड : मृग नक्षत्राच्या दमदार पावसात पेरणी आटोपली. मात्र, त्यानंतर पावसाने पाठ फिरविली. दोन नक्षत्रांनी उघाड दिल्याने पिके करपू लागली. चिंताक्रांत झालेले शेतकरी ग्रामदेवतेला साकडे घालून, देवबाप्पा आता तरी पाऊस पाड अशी आर्त याचना उमरखेड तालुक्यात गावागात दिसत आहे. उमरखेड तालुक्यात मृग नक्षत्रात दमदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकरी उत्साहाने पेरणीच्या कामाला लागला. त्यातच हवामान खात्यानेही मान्सून सक्रिय झाल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी महागडे बियाणे घेऊन पेरणी केली. परंतु आता गत तीन आठवड्यापासून पावसाने पाठ फिरविली. उन्हाळ््यासारखे उन्ह तापत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. या संकटातून सावरण्यासाठी शेतकरी ग्रामदेवतांना साकडे घालत आहेत. गावागावात महाप्रसाद आणि भंडाऱ्याचे आयोजन केले जात आहे. वरूण राज्या वक्रदृष्टीने पिके धोक्यात आली आहे. सोयाबीन, कापूस, ज्वारी, मुग, उडीद आदी पिके पाण्या अभावी होरपळत आहे. उन्हाळा सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी, शेतमजुरांच्या हाताला काम नाही. सर्वांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. लहान मुले धोंडी काढून वरूणराजाची विनवनी करीत आहेत, मात्र वरुणराजा प्रसन्न व्हायला तयार नाही.
देवबाप्पा आता तरी पाऊस पाड
By admin | Published: July 12, 2017 1:08 AM