पाणीटंचाई भीषण वळणावर : १०० विहिरी अधिग्रहित लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मे महिन्यात तापमानात वाढ होताच जिल्ह्यातील ३५० गावांमध्ये पाणीटंचाईचा भडका उडाला आहे. त्यामुळे १५ टँकर सुरू करण्यात आले असून १०० खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या.यावर्षी जिल्हा परिषदेने पाणीटंचाई निवारणार्थ प्रथम दोन कोटी ८८ लाखांचा कृती आराखडा तयार केला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी आधी चौदाव्या वित्त आयोगातील निधी खर्चाचा जाब विचारल्याने हा आराखडा रखडला. हा निधी प्राधान्यायाने पाणीटंचाई उपाययोजनांवर खर्च करावयाचा असताना ग्रामपंचायतींनी तो भलत्याच कामांवर खर्च केल्याने ही वेळ ओढवली. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहे. सध्या जिल्ह्यात आठ शासकीय आणि सात खासगी, अशा १५ टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू आहे. यात आर्णी तालुक्यातील सुधाकरनगर, दिग्रस तालुक्यातील आरंभी, मरसूळ, पुसद तालुक्यातील म्हैसमाळ, शिवाजीनगर, उपवनवाडी, बाळवाडी, उमरखेड तालुक्यातील बोथावन, यवतमाळ तालुक्यातील पिंप्री, पांढरी, माळम्हसोला, धानोरा, बोथ, जांभुळवाणी, गोदणी, लोहारा आदी गावांचा समावेश आहे. या सर्व गावांना टँकरने पाणी पुरविले जात आहे. याशिवाय विविध तालुक्यात १०० खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. यात आर्णी तालुक्यात सर्वाधिक २१ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या. यवतमाळ तालुक्यात १९, दिग्रस तालुक्यात १८, पुसद तालुक्यात १३, नेर तालुक्यात ११, मारेगाव तालुक्यात पाच, दारव्हा तालुक्यात चार, तर वणी तालुक्यात वरझडी बंडा येथील एक खासगी विहीर अधिग्रहित करण्यात आली आहे. या विहिरींवरून ग्रामस्थ तहान भागवित आहे. ग्रामीण भागात हाहाकार जिल्ह्यातील जवळपास ३५० गावांम्ध्ये तीव्र पाणीटंचाईने नागरिक व्याकूळ झाले आहे. जिल्हा परिषदेने तेथील पाणीटंचाई निवारणार्थ २१ टँकर आणि २७२ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी तूर्तास केवळ १५ टँकर आणि १०० खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यास मंजुरी बहाल केली आहे. त्यामुळे उर्वरित गावातील पाणीटंचाई तीव्र झाली असून नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. २८ गावांमध्ये चौदाव्या वित्त आयोगातून नळ योजनांची विशेष दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या योजनांची दुरुस्ती होईपर्यंत पावसाळा सुरू होईल.
मे हिटचा ३५० गावांना तडाखा
By admin | Published: May 25, 2017 1:13 AM