आत्माची मदत : सावर येथे वर्षभरातच व्यवसाय भरभराटीस यवतमाळ : अनेक युवक उच्च शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे न लागता स्वत:चा व्यवसाय सुरू करून त्यात यशस्वी होत असल्याचे दिसून येत आहे. असाच मार्ग बाभूळगाव तालुक्यातील सावर येथील एमबीएससारखे उच्च शिक्षण घेतलेल्या युवकाने पत्करला आहे. त्याने केवळ व्यवसायच सुरू केला नाही, तर त्यात वर्षभरातच यशस्वी भरारी घेतली आहे. अमित चंद्रशेखर वानखडे असे या होतकरू युवकाचे नाव आहे. कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने आत्मातर्फे प्राप्त अनुदानातून शेतकऱ्यांवर विविध शेतीपूरक व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते. दीड वषार्पूर्वी अमितने यवतमाळ येथी कृषी विज्ञान केंद्रात कुक्कुटपालनाचे प्रशिक्षण घेतले होते. तेव्हापासून हा व्यवसाय करायचा, अशा त्याने निर्धार केला होता. बाभूळगाव तालुक्यातील सावर हे अमितचे छोटेसे गाव आहे. जुलै २०१४ मध्ये अमितने मामा मनिष ढवळे यांच्या सोबतीने कुक्कुटपालन व्यवसाय सुरु केला. त्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज घेतले. केवळ वर्षभरात कुक्कुटपालन व्यवसायाने भरारी घेतली आहे. यासाठी एकूण गुंतवणूक जवळपास १२ ते १३ लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. या व्यवसायात कोंबडा दोन महिन्याचा झाल्यानंतर विक्रीस येतो. प्रत्येकी दोन महिन्यांचे प्रती वेळी सहा हजार कोंबड्यांचे पाच लॉट आतापर्यंत त्यांनी विकले आहे. वर्षभराच्या अनुभवातून या व्यवसायातील बऱ्यापैकी तंत्रज्ञान आत्मसात केल्याने कमी दिवसात त्यांनी हा व्यवसाय शिकून घेतला आहे. आत्माच्यावतीने कुक्कुटपालन व्यवसायाचे प्रशिक्षण मिळाले नसते तर कदाचित एखादी छोटी-मोठी नोकरी करत राहिलो असतो, असे अमित वानखेडे यांनी सांगितले. युवकांनी नोकरीच्या मागे न लागता शेतीसोबतच स्वयंरोजगार तथा जोडधंद्याला पसंती द्यावी, असे अमित वानखेडे यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आत्माचे प्रकल्प संचालक अनिल इंगळे यांनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
एमबीए युवकाने यशस्वी केला कुक्कुटपालन व्यवसाय
By admin | Published: November 18, 2015 2:45 AM