लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केंद्र सरकार वैद्यकीय व्यवसायासंदर्भात राष्ट्रीय वैद्यकीय विधेयक आणत आहे. या विधेयकात इंडियन मेडिकल असोसिएशनने सुचविलेल्या सूचनांचा समावेश नाही. या विरोधात देशपातळीवर आंदोलन केले जात आहे. याला यवतमाळच्या आयएमए असोसिएशनने पाठिंबा दिला असून सर्व खासगी डॉक्टरांनी १२ तास कामबंद आंदोलन पुकारले. यात केवळ अत्यावश्यक सेवा वगळण्यात आली.एनएमसी (राष्ट्रीय वैद्यकीय विधेयक) याबाबत एक वर्षापासून शासनस्तरावर चर्चा सुरू होती. आता हे विधेयक संसदेत मांडले जाणार आहे. या विधेयकातील काही अटी जाचक असून याला विरोध केला आहे. त्याकरिता यवतमाळ आयएमएने मंगळवारी सकाळी ६ ते सायंकाळी ६ असा कामबंद आंदोलनाचा पवित्रा घेतला. विधेयकाला विरोध करणारे निवेदन आयएमएचे माजी राज्याध्यक्ष डॉ.टी.सी. राठोड यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांना देण्यात आले. तसेच निवेदनाच्या प्रती पालकमंत्री मदन येरावार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड व खासदार भावना गवळी यांनाही देण्यात आल्या.नवीन विधेयकामुळे खासगी क्षेत्रात भ्रष्टाचार वाढतील, खासगी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास कुठल्याही अटी नाही, वैद्यकीय महाविद्यालयांना जागा वाढविण्याची परवानगी राहील, खासगी महाविद्यालयातील ४० टक्के जागांवरच सरकारचा अंकुश राहील. यामुळे देशातील वैद्यकीय शिक्षण महाग होईल, असे आक्षेप आयएमएने घेतले आहे. परीक्षा पास होवून एमबीबीएस झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एक्सीस्ट परीक्षा द्यावी लागेल. हे सर्व नियम अन्यायकारक असून याला आयएमएने कडाडून विरोध केला आहे.
वैद्यकीय विधेयकाविरोधात यवतमाळात डॉक्टरांचा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 10:00 PM
केंद्र सरकार वैद्यकीय व्यवसायासंदर्भात राष्ट्रीय वैद्यकीय विधेयक आणत आहे. या विधेयकात इंडियन मेडिकल असोसिएशनने सुचविलेल्या सूचनांचा समावेश नाही. या विरोधात देशपातळीवर आंदोलन केले जात आहे.
ठळक मुद्देराज्यव्यापी आंदोलन : अत्यावश्यक सेवा सुरू