यवतमाळ : ओपीडी २४ तास का सुरू ठेवत नाही असे विचारून अधीक्षकाला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने मारहाण केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी सकाळी यवतमाळातील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले.
शिवसेनेचे यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे शुक्रवारी सकाळी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले. ते अधीक्षक उत्तरवार यांना भेटले. तुम्ही ओपीडी केवळ २ वाजेपर्यंत का ठेवता, रुग्णांना परत जावे लागते. त्यामुळे २४ तास ओपीडी ठेवावी, अशी सूचना ढवळे यांनी केली. मात्र २ वाजेपर्यंतचीच वेळ निर्धारित असल्याचे उत्तरवार यांनी सांगताच ढवळेंचा पारा भडकला व त्यांनी उत्तरवार यांच्या श्रीमुखात हाणली. ही बाब कळताच वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व डॉक्टर व आरोग्य कर्मचारी एकत्र आले. त्यांनी कामबंद आंदोलन पुकारले. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे रुग्णांना प्रतीक्षेत राहावे लागले. महाविद्यालयाच्या आवारात कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन या मारहाणीचा निषेध केला. महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. मनिष श्रीगिरिवार या प्रकरणात यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल करणार आहे. सर्व कर्मचारी कामबंद करून रुग्णालयाच्या बाहेर आल्याने रुग्णांचे हाल सुरू होते.
मारहाण करणारे संतोष ढवळे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत यवतमाळ मतदारसंघातून रिंगणात होते. ३७ हजार मतांसह ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. २०१४ च्या निवडणुकीत ढवळे यांचा भाजपचे उमेदवार, पालकमंत्री मदन येरावार यांनी अवघ्या १२०० मतांनी पराभव केला होता. सलग दुसऱ्या निवडणुकीत पराभव होऊनही ढवळे सक्रिय आहेत. मदन येरावार निवडून आले असले तरी जनतेच्या मनातील खरा आमदार आपण असल्याचे संतोष ढवळे सांगतात. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी यवतमाळ-दारव्हा रोडवरील रेल्वे क्रॉसिंगवर पडलेले खड्डे अपघात टाळण्यासाठी स्वखर्चाने बुजविले आहेत. त्यांच्या या पुढाकाराचे स्वागत होत असतानाच शुक्रवारी त्यांनी केलेल्या मारहाणीमुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या कर्मचाºयांनी त्यांचा निषेध नोंदविला व कामबंद आंदोलन पुकारले. या मारहाणीमुळे ढवळे यांच्या स्वखर्चाने रस्ता बांधण्याच्या चांगल्या कामावर पाणी फेरले गेल्याचे मानले जाते.