लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील शिवसेनेत खासदार व राज्यमंत्र्यात वैर निर्माण झाले आहे. पक्षातच दोन टोक तयार झाल्याने सामान्य सैनिकांची घुसमट होत आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी मार्इंदे चौकातील ज्येष्ठ शिवसैनिकाने चक्क उपोषण सुरू केले आहे.शिवसेनेत राज्यमंत्री संजय राठोड व खासदार भावना गवळी दोघेही मातब्बर नेते आहेत. त्यांच्याकडे तीन ते चार निवडणुका जिंकण्याचा अनुभव आहे. पक्ष संघटनाचे कसब आहे. मात्र जिल्हा प्रमुखाच्या नियुक्तीवरून या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. आता या ठिणगीने वणव्याचे रुप धारण केले आहे. हा वाद दोन्ही नेत्यांसाठी व सोबत शिवसेनेसाठी नुकसानीचा ठरणारा आहे. यामुळे या नेत्यांनी एकत्र येऊन पूर्वीसारखेच काम करावे ही मागणी घेऊन शिवसेनेतील २५ वर्षांपासून सक्रिय असलेल्या गिरीष व्यास यांनी उपोषण सुरू केले आहे.खासदार व मंत्र्यातील वैर इतके टोकाला गेले आहेत की दोघेही एका व्यासपीठावर येण्याचे टाळतात. सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही खासदाराला निमंत्रण असेल तर मंत्री येत नाही, मंत्र्यांना निमंत्रण असेल तर खासदार जात नाही, अशी स्थिती आहे. यामुळे पक्षांतर्गत विरोध वाढीला लागला आहे. आता लोकसभा व त्यानंतर विधानसभा या दोन निवडणुका होऊ घातल्या आहे. त्यापूर्वी या दोन्ही नेत्यांमधील वाद दूर व्हावा याकरिता व्यास यांचे उपोषण आहे. दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन या उपोषणाची सांगता करावी व पुढे एकदिलानेच पक्षकार्य करण्याचे आश्वासन द्यावे, एवढी माफक अपेक्षा घेऊन व्यास यांचे उपोषण सुरू आहे. उपोषणाचा पहिला दिवस आहे. आता ही नेते मंडळी ज्येष्ठ शिवसैनिकाच्या या आंदोलनाला कधी प्रतिसाद देतात, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. उपोषण सोडविण्यासाठी एकत्र आलेली नेते मंडळी निवडणूक काळातही सोबत राहतील का यावरही चर्चा रंगत आहे.
नेत्यांनो एकत्र या, शिवसैनिकाचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 10:31 PM
जिल्ह्यातील शिवसेनेत खासदार व राज्यमंत्र्यात वैर निर्माण झाले आहे. पक्षातच दोन टोक तयार झाल्याने सामान्य सैनिकांची घुसमट होत आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी मार्इंदे चौकातील ज्येष्ठ शिवसैनिकाने चक्क उपोषण सुरू केले आहे.
ठळक मुद्देगिरीष व्यास : खासदार आणि राज्यमंत्र्यांना कळकळीची विनंती