शिवसेनेतील दुही : कळंब तालुक्यात नवख्यांना संधीने नाराजीचा सूर गजानन अक्कलवार । लोकमत न्यूज नेटवर्क कळंब : शिवसेना जिल्हा प्रमुख पदाचा वाद चव्हाट्यावर येण्यापूर्वी तालुका प्रमुखाच्या नियुक्तीवरुन तालुक्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला. दुसऱ्या पक्षातून येणाऱ्या एका कार्यकर्त्याला थेट तालुका प्रमुख म्हणून नियुक्ती दिली जाणार होती. जिल्हा प्रमुख नियुक्तीला स्थगनादेशामुळे तालुका प्रमुखाची नियुक्तीही रखडली. मात्र बाहेरून येणाऱ्यांना पदे देण्याचा विषय शिवसैनिक ना.रामदास कदम यांच्याकडे मांडणार आहेत. दुसऱ्या पक्षातून येणाऱ्या चांगल्या लोकांचे स्वागत झाले पाहिजे. पक्ष वाढीसाठी इनकमींगला कोणाचाही विरोध नाही. परंतु नव्याने आलेल्यांना मोक्याची पदे दिल्यास वर्षानुवर्षापासून सतरंज्या उचलणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. नवीन लोकांना त्यांच्या परफॉमर्सच्या आधारावर पदांचे वाटप व्हावे, अशी मागणी जुन्या पदाधिकाऱ्यांची आहे. अन्यथा सामूहिक राजीनाम्याचे अस्त्रही उपसले जाणार आहे. यासंबंधीची माहिती त्यांनी राज्यमंत्री संजय राठोड, भावना गवळी व जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांच्या कानावरही टाकली आहे. दरम्यान, जिल्हा प्रमुख निवडीचा तिढा सोडविण्यासाठी लवकरच पर्यावरण मंत्री रामदास कदम जिल्ह्यात येत आहे. या भेटीत कळंब तालुक्यातील सर्वच पदाधिकारी ना.कदम यांची भेट घेणार आहे. दिगांबर मस्के यांच्याकडे तालुका प्रमुखाची जबाबदारी आहे. ते कळंबचे नगराध्यक्ष आहे. एक व्यक्ती एक पद या न्यायाने त्यांचे तालुका प्रमुख पद काढण्यात येणार आहे. त्यांच्या जागेवर जुन्याच लोकांचाच विचार व्हावा, अशी मागणी रामदास कदम यांच्याकडे केली जाणार आहे. ‘भाऊ की ताईचा’ साठी चाचपणी भाऊ की ताईचा यासाठी नगरसेवक ते सर्व पदाधिकाऱ्यांची चाचपणीही केली गेली. परंतु आम्ही केवळ शिवसेनाप्रमुखांचे, असे मत अनेक शिवसैनिकांनी व्यक्त केले. कोण पदाधिकारी कोणाचा यासाठी पहिल्यादा फोनवरुन व नंतर प्रत्यक्ष बोलावून मते जाणून घेण्यात आली. स्वाक्षरी मोहिमेत सहभागी करून घेण्याचाही प्रयत्न झाला. पण उघडपणे कोणीही कोणाची बाजू घ्यायला तयार झाले नाही. महसूल राज्यमंत्री संजय राठोड आणि खासदार भावना गवळी यांच्या वर्चस्वाच्या लढाईपासून कळंब तालुक्यातील कट्टर शिवसैनिकांनी अलीप्तवादी धोरण स्वीकारले आहे. अशास्थितीत अनेकांनी बाळासाहेबांप्रती श्रध्दा व्यक्त करीत या वादातून तर सुटका करुन घेतली नाही ना, असाही काहींचा सूर आहे.
शिवसैनिक रामदास कदम यांना भेटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 1:02 AM