दिग्रस : कोपर्डीतील घटनेच्या निषेधार्थ आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसह अन्य मागण्यांसाठी यवतमाळ येथे २५ सप्टेंबरला मराठा-कुणबी क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या नियोजनासंदर्भात दिग्रस येथील जिजाऊ भवनात सोमवारी सायंकाळी समाजाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अॅट्रोसिटी कायद्याचा गैरवापर थांबविण्यात यावा, मराठा आरक्षणाचा निर्णय तत्काळ घ्यावा, या व इतर मागण्यांसाठी २५ सप्टेंबर रोजी यवतमाळात मोर्चा होत आहे. या मोर्चात दिग्रस तालुक्यातून अधिकाधिक समाज बांधव सहभागी व्हावे यासाठी दिग्रस येथे बैठक घेण्यात आली. बैठकीच्या सुरुवातीला काश्मिर हल्ल्यात शहीद झालेल्या १८ सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बैठकीला समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)नियोजनावर चर्चाहिवरासंगम : मराठा -कुणबी समाजाच्यावतीने २५ सप्टेंबर रोजी यवतमाळात क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चात जास्तीत जास्त समाज बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन हिवरा येथील एकवीरा देवी मंगल कार्यालयात आयोजित बैठकीत करण्यात आले आहे. कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या या व इतर मागण्यांसाठी संपूर्ण राज्यात सकल मराठा समाजातर्फे मोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे. २५ सप्टेंबर रोजी यवतमाळ येथे हा मोर्चा होत असून हिवरा परिसरातील नागरिकांनी या मोर्चात सहभागी होण्यासाठी तसेच विचारविनियम आणि नियोजन करण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीला हिवरा परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिग्रस व हिवरा येथे मराठा, कुणबी मोर्चासंदर्भात बैठक
By admin | Published: September 21, 2016 2:06 AM