नागरिकांचा प्रतिसाद : केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावल्याचा आरोप पांढरकवडा/पारवा : शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. त्यांची संपूर्ण दुर्दशा झाली आहे. त्याला केंद्र व राज्यातील भाजप सरकारच जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री आमदार नारायण राणे यांनी मोहदा व पारवा येथे मंगळवारी दुपारी जाहीर सभेत केला. काँग्रेसच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांसाठी आयोजित सभेत राणे बोलत होते. ते पुढे म्हणाले, सोयाबीनला सात हजारांचा भाव मागणाऱ्या फडणविसांना आता कोणी रोखले ? सोयाबीनला आता का सात हजार रूपये भाव देत नाही? गरिबांसाठी काँग्रेस सरकारने सुरू केलेल्या कल्याणकारी योजनांची नाव बदलवून जनतेला तुम्ही किती दिवस फसविणार, असा प्रश्न त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. शिवसेनेचा हात धरून सत्ता मिळविणारे आता शिवसेनेला संपविण्याची भाषा करीत आहे. ही त्यांची दुटप्पी भाषा असल्याचा आरोप त्यांनी केला. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक निमित्ताने सत्ताधारी पक्षाला धडा शिकविण्याची वेळ आली असून या संधीचा लाभ घेऊन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत १२५ वर्षाची परंपरा असलेल्या आमच्या पक्षाच्या उमेदवारांना बळ देण्याचे आवाहन त्यांनी केले. पारवा येथे त्यांनी केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयावर सडकून टीका केली. या निर्णयामुळे गरीब, शेतकरी, मजूर आणि ग्रामीण भागातील सामान्य जनतेला प्रचंड हाल सहन करावे लागले, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे आता ही जनताच त्यांना धडा शिकवेल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी माजी मंत्री अॅड. शिवाजीराव मोघे, प्रा.वसंतराव पुरके व जितेंद्रसिंग कोंघारेकर, बाबू धोपे, फारूक सिद्धीकी, रिजवान भाई व पांढरकवडा, राळेगाव व कळंब तालुक्यातील पक्षाचे उमेदवार यावेळी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
राणे यांची मोहदा, पारवा येथे सभा
By admin | Published: February 15, 2017 2:45 AM