१५५ विषयांवर चर्चा : यवतमाळात कामांचा बॅकलॉग काढण्यासाठी खटाटोप लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : स्थानिक नगरपरिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत सर्वाधिक म्हणजे १५५ विषय चर्चेसाठी ठेवले जाणार आहे. ही जम्बो सभा सोमवारी सकाळी ११ वाजता होत असून, या बैठकीच्या माध्यमातून रखडलेल्या कामाचा बॅकलॉग भरून काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नगरपालिकेतील अनागोंदीमुळे अनेक महत्त्वपूर्ण कामे रखडलेली आहे. शहराच्या वाढीव क्षेत्रासोबत प्रमुख प्रभागातील कामांना गती देण्यासाठी स्थायी समितीत तब्बल १५५ विषय चर्चेकरिता ठेवण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने रस्ता डांबरीकरणाच्या ३५ कामांच्या प्राप्त आॅनलाईन निविदांना मंजुरीचा समावेश आहे. नंतर वैशिष्ट्यपूर्ण कामांच्या तरतुदीतील सीमेंट काँक्रीट नाल्यांचे बांधकाम, सीमेंट काँक्रीट रस्त्यांचे बांधकामासाठी प्राप्त निविदांना मंजुरी दिली जाणार आहे. एकूण १६ कोटींच्या प्राप्त निधीतील कामांचे नियोजन करण्यात आले असून, त्यासाठी बोलाविण्यात आलेल्या निविदांना मंजुरीसाठी ठेवले जाणार आहे. याशिवाय प्रभाग १ ते २० आणि प्रभाग ३ ते १५ या झोन एक व झोन दोनमधील प्रभागांमध्ये कच्च्या नाल्यांचे खोदकाम व माती वाहतुकीच्या निविदा उघडण्यात येणार आहे. हिंदू स्मशानभूमीतील तीन शेड व ओटे दुरूस्तीलाही मंजुरी दिली जाणार आहे. बगीचा विकासासाठी वैशिष्ट्यपूर्ण १० कोटींच्या निधीतून तरतूद केली जाणार आहे. याशिवाय रस्त्यांचे पॅच रिपेअरिंगच्या कामांनाही मंजुरीसाठी ठेवण्यात येईल. पालिकेच्या इतिहासात प्रथमच स्थायी समितीपुढे इतक्या मोठ्या विषयांना एकाचवेळी चर्चेसाठी ठेवण्यात आले आहे. आता यातील नेमके किती विषय मंजूर केले जातात, हे महत्वाचे ठरणार आहे. शहराच्या वाढीव भागातही मोठ्या प्रमाणात कामे घेतली जात आहेत. यात पावसाळ्यातील उपाययोजनेसह आरोग्य संवर्धनासाठी आवश्यक असलेल्या जुजबी कामांचाही समावेश आहे. या सर्व अत्यावश्यक कामांना सभेत मंजुरी मिळते की यावरूनही वादंग होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पालिका प्रशासनाचा गाडा सुरळीत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांत एकवाक्यता असणे गरजेचे झाले आहे.
पालिकेची जम्बो स्थायी समिती सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 1:08 AM