खुशाल खंदारे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातल्या महागाव तालुक्यातील तिवरंग येथील शिंदे कुटुंबाने लग्नपत्रिकेच्या माध्यमातून पाणी वाचा, झाडे लावा असा संदेश दिला आहे. सोबतच स्त्रीभूषणहत्त्या थांबविण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे, लग्नपत्रिकेत या कुटुंबाने बहुतांश हिरव्याच रंगाचा वापर केला आहे.तिवरंग येथील शिंदे कुटुंबातील सदानंद कैलास शिंदे यांचा विवाह नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील कोथळा येथील दीपाली विजयराव वानखडे यांच्याशी जुळला आहे. येत्या २९ तारखेला सदानंद आणि दीपाली विवाहबद्ध होत आहे. शिंदे कुटुंबाने सदानंदच्या विवाहाच्या पत्रिकेतून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला आहे. वधू-वरांच्या नावाच्या ठिकाणी वृक्षाचे चित्र छापले आहे. त्यावर झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश दिला आहे. सोबतच स्त्रीभू्रणहत्त्या थांबविण्याचा संदेश देवून विवाह पत्रिकेवर एक कविताही प्रकाशित केली आहे. या पत्रिकेत जास्तीत जास्त हिरव्या रंगाचाच वापर करण्यात आला आहे. पत्रिकेवर एका बाजूला हुंड्याचे दुष्परिणाम दर्शविले आहे. चक्क एक युवती गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसत आहे. तिच्यासमोर हताशपणे बसलेले वडील दिसून येतात. त्यांच्या अगदी डोक्यावर ‘हुंडा’ शब्द मोठ्या अक्षरात लिहिण्यात आला आहे. त्याखालीच ‘मुलीच्या आयुष्यातलं सुंदर स्वप्न अधुरचं राहून जातं... हुंड्यासाठी बापलेकींचे चाललेले बळी, आता कुठेतरी थांबवायला हवे’ असा संदेश देणारी कविता आहे. सोबतच विकास योजनांना हातभार लावण्याचा संदेशही देण्यात आला आहे. पाकिटावर ‘तुम्ही पाणी वाचवा, पाणी तुम्हाला वाचवेल’ असा संदेश देऊन वृक्षांचे चित्र प्रकाशित केले आहे. ही पत्रिका परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. सोबतच शिंदे कुटुंबाने या पत्रिकेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य केल्याचे बोलले जात आहे.
लग्नपत्रिकेतून दिला ‘पाणी वाचवा’चा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:41 PM
जिल्ह्यातल्या महागाव तालुक्यातील तिवरंग येथील शिंदे कुटुंबाने लग्नपत्रिकेच्या माध्यमातून पाणी वाचा, झाडे लावा असा संदेश दिला आहे.
ठळक मुद्दे तिवरंगच्या कुटुंबाचा उपक्रमपत्रिकेततून स्त्रीभूणहत्त्या थांबविण्याचे आवाहन