यवतमाळ : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत (मनरेगा) १० कोटी २९ लाख रुपयांचा अपहार झाला असून, झरी येथील दोन वन परिक्षेत्र अधिकारी, मुख्य कंत्राटदारासह सात जणांना सोमवारी दुपारी अटक करण्यात आली. यवतमाळ आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.झरी तालुक्यातील आंबेझरी व घुबडी बीटमध्ये मनरेगातून मातीनाला, अनघड दगडी बांधाचे काम केले होते. त्यात आर्थिक अपहार झाल्याची तक्रार रोजगार हमी योजना दक्षता पथकाचे उपअभियंता गुलाबराव भोळे यांनी २६ जून २०१४ रोजी केली होती. त्यानंतर, फौजदारी गुन्हे दाखल झाले. बनावट दस्ताऐवज तयार करून त्याचा वापर करत संगनमताने ही रक्कम हडपण्यात आली.जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव यांच्या पथकाने अपहरणाचा तपास केला.>कागदोपत्रीच दाखविले कामसोमवारी आर्थिक गुन्हे शाखेने मुख्य आरोपी आंबेझरी बीटचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश मधुकर चवळढाल (४९), घुबडी बीटचे वनपरिक्षेत्र अधिकारी जीवन अमृत मेश्राम (४८), वनपाल हिरामन महादेव मुळे (५८, सर्व रा. पांढरकवडा), सेवानिवृत्त वनपाल विश्वेश्वर भोजराज जुनघरे (रा. मैथीलीनगरस लोहारा), वनरक्षक गजानन लोडबाजी कुडमथे, वनरक्षक माणिक हनुमंत मोहिते (५०, दोघे रा. पांढरकवडा) यांच्यासह पांढरकवडा येथील वन कंत्राटदार अमीन अब्दुल राजानी (५६) यांना अटक केली. त्यांनी कागदोपत्री काम दाखवून १० कोटी २९ लाखांचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल झाला.
‘मनरेगा’त १० कोटींचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 5:48 AM