वणी : प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिली जाणारी मध्यान्ह भोजन योजना निधीअभावी अडचणीत आली आहे़ त्यामुळे सकस आहाराचा ‘कस’ कमी होण्याची शक्यता आहे़प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन योजना शाळांमध्ये सुरू झाली़ ग्रामीण भागातील शाळांत धान्याचा पुरवठा कंत्राटदाराद्वारे केला जातो़ शहरी भागातील शाळांना केवळ तांदूळाचा पुरवठा केला जाते़ उर्वरित दाळ, कडधान्ये, तिखट, मीठ, हळद, मसाला हे बाजारातून विकत घेऊन विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्याची सक्ती आहे़ ग्रामीण भागातील शाळांना भाजीपाला, इंधन, पूरक आहार व शिजविण्याची मजुरी यावरील खर्चाची रक्कम देण्यात येते़ शहरी भागातील शाळांना तांदूळाव्यतीरिक्त सर्व वस्तूंसाठी निधी दिला जातो़ मात्र गेल्या चार-पाच महिन्यांपासून शाळांना हा निधी मिळाला नाही़ पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची सप्टेंबर महिन्यापर्यंतची रक्कम देण्यात आली आहे़ मात्र सहावी ते आठवीसाठीची आॅगस्ट महिन्यापासूनची रक्कम शाळांना अद्याप मिळाली नाही़ पाच महिन्यांपासून उधारीवर व्यवहार सुरू आहे़ आता मुख्याध्यापकांची ‘पत’ संपण्याची वेळ आली आहे़ मजुरी न मिळाल्याने स्वयंपाक करणारे मजूर व बचत गटही आर्थिक अडचणीत आले आहे़ त्यामुळे मध्यान्ह भोजनातील ‘कस’ लुप्त होण्याची वेळ आली आहे़चार-पाच महिन्यांसाठी दुकानदारही उधार देण्यास नकार देतात़ भाजीपाला व इंधन उधार मिळत नसल्याने त्यावरील खर्च मुख्याध्यापकांना स्वत:जवळून करावा लागतो़ मुख्याध्यापकांची चार-पाच महिन्याची रक्कम गुंतल्याने तेही अडचणीत आले आहे़ मध्यान्ह भोजन योजना व्यवस्थित चालवायची असेल, तर दर महिन्याला निधी मिळणे आवश्यक आहे़ रक्कम न मिळाल्याने आपोआपच या योजनेला भ्रष्टाचाराची कीड लागण्याची शक्यता बळावते. याकडे प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे़ (स्थानिक प्रतिनिधी)
निधीअभावी मध्यान्ह भोजन योजना सापडली अडचणीत
By admin | Published: January 14, 2015 11:17 PM