लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. सध्या आर्णी रोड परिसरात व वाघापूर बायपास परिसरात घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. या घरफोड्या थांबविण्यासाठी पोलीस रस्त्यावर पेट्रोलिंग करीत आहेत. मात्र चोर त्यांच्यापेक्षा वरचढ ठरत असून, लोहारा व एमआयडीसीतील खुल्या मैदानात चोरटे रात्रीचा आश्रय घेतात. तेथे मद्यपान, गांजा सेवन करून चोरी करायला निघतात. बुधवारी येथील वडगाव नजीकच्या एमआयडीसी परिसरात चोरीच्या दोन दुचाकी आढळल्या. निर्जनस्थळी टोळक्याने बसून गांजा सेवन केले जाते. येथूनच गुन्हेगारीला खतपाणी मिळते. टेक्सटाईल झोन अंतर्गत एमआयडीसीचा विस्तार झाला आहे. वडगावला लागून असलेल्या मोकळ्या जागेत झुडुपांचा आसरा घेऊन रात्री पार्टी रंगते. येथे दररोजच शेकोटी पेटवून मद्यसेवन केले जाते. संपूर्ण परिसरातच दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. पोलिसांची गस्त संपेपर्यंत चोरटे तेथे ठिय्या देऊन असतात. संधी मिळाल्यानंतर रेकी केलेल्या घरांना पद्धतशीरपणे लक्ष्य केले जाते. नियोजनबद्ध पद्धतीने चोरट्यांचे काम सुरू असल्याने गेल्या वर्षभरात एकही मोठा चोरीचा गुन्हा उघडकीस आलेला नाही. दुचाकी चोरीच्याही घटना उघड झाल्या नाहीत. मंगळवारी रात्री दारव्हा मार्गावरील भारती अपार्टमेंटच्या पार्किंगमधून एमएच २९ - क्यू ३९५५ क्रमांकाची दुचाकी चोरीला गेली. ही दुचाकी उल्हास ठाकूर यांची असल्याचे स्पष्ट झाले. याच परिसरात दुसरी एमएच ०९ - एएक्स ५२४० क्रमांकाची दुचाकी पडलेली होती. दुचाकी चोरून ती चोरीच्या कामासाठी वापरायची व फेकून द्यायची असा नवा फंडा चोरांनी शोधला आहे. निर्जनस्थळी पोलिसांची गस्त होत नसल्याने गुन्हे उघड होताना दिसत नाहीत.