काम सुरू करण्याची मागणी : पुसद तहसीलदारांसह अधिकाऱ्यांना नागरिकांचे निवेदन पुसद : तालुक्यात रोजगाराअभावी मजुरांचे स्थलांतरण होत असून स्थलांतरण रोखण्यासाठी मग्रारोहयोची कामे तत्काळ सुरू करावी, अशी मागणी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. पुसद तालुका हा भौगोलिक दृष्ट्या डोंगराळ आहे. त्यामुळे उन्हाळ्यात या परिसरात शेतीची कामे नसतात. सर्व शेतमजूर खरीप पिकावरच अवलंबून असतात. आता उन्हाळ्यात मजुरांच्या हाताला कामच नाही. त्यामुळे मजूर मंडळी परप्रातांत स्थलांतरीत होत आहे. ग्रामीण भाग ओस पडला आहे. या मजुरांचे स्थलांतरण रोखण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावी, अशी मागणी गटविकास अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आणि उपवनसंरक्षकांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनावर अॅड. सचिन नाईक, अभय गडम, ज्ञानेश्वर तडसे, नारायण पुलाते, पुंडलिक शिंदे, साकीब शाह, रमेश पवार, रुपेश जाधव, अनिल राठोड, महेश आर्य, अजय नागठाणे, अश्विन भेरडे, भाऊसाहेब पवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)
रोहयोच्या कामाअभावी मजुरांचे स्थलांतरण
By admin | Published: April 17, 2017 12:27 AM