दारव्हा : तालुक्यातील सांगवी रेल्वे येथील कृषिविज्ञान केंद्रात वर्ल्ड मिल्क डेचे औचित्य साधून ऑनलाइन पद्धतीने दूध दिवस साजरा करण्यात आला.
दुधामध्ये समाविष्ट पोषकतत्त्वांचा शरीराला होणारा फायदा, याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला स्थानकोत्तर पशुविज्ञान संस्था अकोलाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल भिकाने प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी दुग्ध व्यवसायामध्ये मुक्त संचार गोठ्याचे महत्त्व, या विषयावर मार्गदर्शन केले. सुरुवातीला कृषिविज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. नंदकिशोर हिरवे आणि कृषिविज्ञान केंद्र, यवतमाळचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. सुरेश नेमाडे यांनी मनोगत व्यक्त केले.
कृषिविज्ञान केंद्र, सांगवी (रेल्वे) व यवतमाळ आणि कृषी महाविद्यालय उमरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला होता. कार्यक्रमात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. सूत्रसंचालन विषयतज्ज्ञ देवानंद राऊत, तर आभार उमरखेडचे प्रा. अनंत राऊत यांनी मानले.