रितेश पुरोहित - महागाव साडेतीन शक्तिपीठापैकी पूर्ण पीठ असलेल्या माहूर येथे जाण्यासाठी असलेल्या एकमेव पुसद-माहूर रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. गुंज ते खडका दरम्यान वर्षभरापासून दोन-दोन फुटांचे खड्डे पडले आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधीची बिले मंजूर झाली आहे. मात्र प्रत्यक्षात खड्डे कायमच आहे. यामुळे भाविकांसह नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर हा मार्गच बंद होण्याची भीती आहे. महागाव तालुक्यातून जाणार्या राज्य आणि जिल्हा मार्गांंची प्रचंड दुरवस्था झाली आहे. अत्यंत वर्दळीच्या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. पुसद ते माहूर हा अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे. या मार्गावरून दररोज भाविकांची १00 ते दीडशे वाहने दर्शनासाठी माहूर येथे जातात. तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या विविध आगाराच्या ६0 ते ७0 बसेस नियमित धावत असतात. पुसद या मुख्य बाजारपेठेत जाण्यासाठी महागाव तालुक्यातील नागरिकांसाठी हा एकमेव मार्ग आहे. अशा या महत्वपूर्ण मार्गावर वर्षभरापासून गुंज ते खडका दरम्यान खड्डे पडले आहे. दीड ते दोन फुटाचे खड्डे या ठिकाणी दिसत आहे. वाहन चालविताना चालकांना मोठी कसरत करावी लागते. विशेष म्हणजे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी यापूर्वी कोट्यवधी रुपयांची बिले काढण्यात आली. प्रत्यक्ष मात्र दुरुस्ती झाल्याचे कधी दिसलेच नाही. दुरुस्ती झाली तरी दुरुस्ती पाठोपाठच रस्ते उखडतात. या रस्त्याच्या कामात मोठय़ा प्रमाणात गैरप्रकार झाला आहे. आता पावसाळा तोंडावर आला आहे. पावसाळय़ापूर्वी या रस्त्याची डागडुजी झाली नाही तर हा मार्गच बंद पडण्याची भीती आहे. खड्डय़ामुळे अनेकदा अपघात झाले आहे. दररोज दुचाकीस्वार तर या रस्त्यावर आपटतात. अनेक जण जखमी झाले असून काहींना अपंगत्वही आले आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यायला तयार नाही.
दुरुस्तीसाठी कोट्यवधी, खड्डे मात्र कायमच
By admin | Published: June 05, 2014 12:04 AM