यवतमाळ : मोठ्या प्रमाणावर पैशाचा लाभ होईल, या लोभापायी आतापर्यंत अनेक जणांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलीस विभागाकडून सतर्क राहण्याच्या अनेकदा सूचना दिल्या जातात; परंतु या घटना कमी होण्याऐवजी सतत वाढतच आहेत. अशीच एक घटना येथे घडली. हेल्थ विम्याच्या नावाखाली दिल्लीतील तीन भामट्यांनी येथील रामभाऊ गेडाम यांची चक्क २१ लाख ७३ हजार रुपयांची फसवणूक केली.
हेल्थ इन्शुरन्सचे हप्ते नियमित भरा, तुम्हाला मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ मिळण्याचे आमिष दाखवून पांढरकवडा येथील कुंदननगरमधील रामभाऊ गेडाम यांची २१ लाख ७३ हजार ८० रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी पांढरकवडा पोलिसांनी दिल्ली येथील करण सक्सेनासह तीन जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले.
रामभाऊ गेडाम हे भुसावळ रेल्वे सेवेत असताना त्यांनी त्यांचा मुलगा योगेशच्या नावाने २००९ मध्ये एलआयसी एजंट अतुल राठोडमार्फत टाटा एआयजी पॉलिसी या नावाने आरोग्य विमा काढला होता. त्यामध्ये सुरुवातीला पहिला हप्ता १५ हजार रुपये भरला. रामभाऊ गेडाम हे २०१९ मध्ये सेवेतून निवृत्त झाल्यानंतर पांढरकवडा येथे राहण्यास आले. पहिला हप्ता भरल्यानंतर सुनील शर्मा नामक व्यक्तीचा रामभाऊ गेडाम यांना फोन आला व त्याने तुमच्या पॉलिसीची रक्कम १ लाख ५० हजार रुपये झाली आहे; परंतु ती काढण्यासाठी आधी तुम्हाला काही रक्कम जमा करावी लागेल; त्यानंतर गेडाम यांनी त्याने दिलेल्या बँकेच्या खात्यात १० हजार रुपये भरले.
त्यानंतर भामट्यांनी तुमचे विम्याचे पैसे वाढत आहेत; तेव्हा तुम्ही ताबडतोब पुन्हा पैसे भरा म्हणून सांगितले. त्यानंतर २०११ ते २०१८ दरम्यान दोन लाख रुपये भामट्याने सांगितलेल्या विविध खात्यांत जमा केले. त्यानंतर तुमचे पैसे पुन्हा वाढत असून, तुम्ही विम्याचे हप्ते सांगितलेल्या खात्यात जमा करा म्हणून सांगितले. २५ ऑगस्ट २०२० रोजी भामट्याने व्हाॅटस्ॲपद्वारे गेडाम यांना एक डीडीचा फोटो पाठविला. ४२ लाख ८४ हजार २००रुपये एवढ्या रकमेचा हा डीडी रामभाऊ गेडाम यांच्या नावाने होता. हा डीडी पोस्टाने पाठवत असल्याचे त्या भामट्यांनी सांगितले. त्यामुळे गेडाम यांचा त्या भामट्यावर विश्वास बसला.
गेडाम यांनी २६ नोव्हेंबर २०१९ ते १९ सप्टेंबर २०२० यादरम्यान भामट्यांनी सांगितलेल्या बँकेच्या खात्यात २१ लाख ७३ हजार ३०० रुपये जमा केले; परंतु आत्तापर्यंत गेडाम यांना मुळातच खोटा असलेला तो डीडी आलाच नाही. भामट्यांच्या फोन नंबरवर फोन लावूनही गेडाम यांना उडवाउडवीची उत्तरे मिळत होती. त्यामुळे आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी याबाबत पांढरकवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी सुनील सक्सेना, सुनील शर्मा, जसवंतसिंग करण सक्सेना यांच्याविरुद्ध भादंवि कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.
अशा भामट्यांपासून सावध रहा
सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणावर घडत असूनही नागरिकांना अधिक लोभापायी अशा भामट्यांकडून फसविले जात आहे. नागरिकांनी अशा भामट्यांपासून सावध राहावे. ऑनलाईन व्यवहार करताना सतर्कता बाळगावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांनी केले.