हाय जम्प मॅट : जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणतात, मी तर नवीन आहे रूपेश उत्तरवार यवतमाळ खेळाडूंसाठी असलेले लाखो रुपये किंमतीचे क्रीडा साहित्य येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात चक्क कुत्र्यांनी कुरतडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचा फेरफटका मारला असता तेथील एका खोलीत फोमच्या मॅट ठेवलेल्या आढळल्या. या खोलीचा दरवाजा तुटलेला आहे. त्यातून कुत्रे आत प्रवेश करतात. खेळाडूंचे साहित्य असलेली ही खोली जणू पावसाळ्यात कुत्र्यांचे आश्रयस्थान बनली आहे. कुत्र्यांनी या सर्व मॅट कुरतडल्या आहेत. या मॅटमध्ये कुत्र्यांनी झोपण्यासाठी जागा तयार केली. या गंभीर प्रकाराबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटीये यांची भेट घेतली असता ‘मी तर नव्यानेच येथे आलो आहे, मला याबाबत काहीच माहिती नाही’ असे सांगत त्यांनी कानावर हात ठेवले. क्रीडा कार्यालयातील अन्य एका कर्मचाऱ्याला विचारणा केली असता, हे अॅथलॅटिक्स साहित्य असल्याचे त्यांनी सांगितले. या हाय जम्प मॅट असून उंची उडीसाठी त्या खेळाडूंना दिल्या जातात. या मॅटची खरेदी २०१० मध्ये झाली असावी, अशी शक्यता या कर्मचाऱ्याने व्यक्त केली. या मॅट नवीन की जुन्या, उपयोगात आहेत की नाही, त्याची नेमकी किंमत किती हे मात्र अधिकृतरीत्या कुणीही सांगू शकलेले नाही.
लाखोंचे क्रीडा साहित्य कुत्र्यांनी कुरतडले
By admin | Published: August 13, 2016 1:21 AM