इम्तीयाज जलील : नि:पक्षपणे दोषींवर कारवाई करावी उमरखेड : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेक प्रकरणातून उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एमआयएमचे आमदार इम्तीयाज जलील यांनी उमरखेडला रविवारी भेट दिली. यावेळी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला.पोलीस प्रशासनाने कोणत्याही राजकीय पक्षाच्या दबावाला बळी न पडता नि:पक्षपणे कारवाई करावी, समाजकंटक कोणत्याही जातीचा असो त्याची गय करू नये, तसेच निरपराधांना त्रास देऊ नये, असे जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्याशी बोलताना सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान चार दिवसानंतर उमरखेड शहरातील परिस्थिती पूर्वपदावर आली असून सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहे. मात्र पोलिसांनी बंदोबस्त कायम ठेवला आहे. चौकाचौकात पोलीस तैनात असून शहरात येणाऱ्या व जाणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. तसेच समाजकंटकांवर करडी नजर आहे. (शहर प्रतिनिधी)
एमआयएम आमदार उमरखेडमध्ये
By admin | Published: September 19, 2016 1:04 AM