जिल्हा परिषद : भाजपा-सेना युतीवर प्रश्नचिन्ह कायम यवतमाळ : जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर भाजपा, शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांची झालेली पहिली बैठक निष्फळ ठरल्याची माहिती आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्ता कुणाची राहणार, हा पेच कायम आहे. २१ मार्च रोजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष ठरणार आहे. सर्वाधिक २० जागा सेनेकडे आहेत. भाजपा १८ तर काँग्रेस व राष्ट्रवादीकडे प्रत्येकी ११ जागा आहेत. एक जागा अपक्षाकडे आहे. स्पष्ट बहुमत कुणालाच नसल्याने सत्ता स्थापनेसाठी कसरत करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांच्या निवासस्थानी एक बैठक होळीदरम्यान पार पडली. शिवसेना नेते महसूल राज्यमंत्री संजय राठोड, भाजपाचे पुसदमधील नेते तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड. निलय नाईक या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेतील सत्तेबाबत चर्चा झाली. मात्र ठोस काही तोडगा न निघाल्याने ही बैठक बारगळल्याचे सांगितले जाते. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळू शकतो. अशावेळी काँग्रेसने भाजपाला साथ देण्याची तयारी दर्शविली, तरी त्यांचे संख्याबळ जुळण्याची शक्यता नाही. केंद्रात व राज्यात सत्तेत असलेली भाजपा-शिवसेना जिल्हा परिषदेतसुद्धा युतीची सत्ता स्थापन करेल काय, याकडे लक्ष लागले आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असल्याचे सांगितले जाते. नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीतसुद्धा भाजपा-शिवसेनेन कुठेच एकत्र सत्ता स्थापन केली नाही. भाजपाला सत्तेत सहभागी करून घेण्याऐवजी शिवसेनेने कुठे काँग्रेसची तर कुठे राष्ट्रवादीची साथ घेतली. जिल्हा परिषदेतही हाच पॅटर्न वापरण्याचा शिवसेनेचा मनसुबा दिसतो. स्थानिक पातळीवर युतीची सेनेची इच्छा नाहीच. मात्र मुंबईतून दबाव आल्यास युतीचा मार्ग स्वीकारला जाऊ शकतो, असे सांगितले जाते. जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेसाठी बाहेरुन पाठिंब्याचा प्रयोगही केला जाऊ शकतो. भाजपा-सेनेची सत्ता बसू नये, असा राष्ट्रवादीतील सूर आहे. युतीची सत्ता बसल्यास एखादे सभापतीपद खास पुसदला देऊन तेथे या माध्यमातून राष्ट्रवादीपुढे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जाऊ शकतो. राजकीयदृष्ट्या ही बाब नुकसानकारक असल्यानेच राष्ट्रवादीला शिवसेनेची साथ व सत्ता अधिक सोईची वाटत असल्याचे सांगितले जाते. (जिल्हा प्रतिनिधी) भाजपाची सेनेला थेट आॅफर राज्यमंत्र्यांच्या बैठकीत भाजपाकडून ‘अध्यक्ष आमचा आणि उपाध्यक्ष पदावर तुमचा भाऊ’ अशी थेट आॅफर शिवसेनेला दिली गेल्याची माहिती आहे. याच मुद्यावरून शिवसेनेने नाराजीही व्यक्त केली. आमच्या पक्षाचा उमेदवारही तुम्हीच ठरविणार का, असा सवाल सेनेकडून केला गेल्याचे सांगितले जाते.
मंत्र्यांची बैठक निष्फळ
By admin | Published: March 16, 2017 12:55 AM