संजय भगत
महागाव : जुगार अड्ड्यावर धाड घालून पाेलिसांनी आरोपींना रंगेहाथ पकडले. त्यांच्याजवळून रोख रक्कम जप्त केली. मात्र, प्रत्यक्षात जप्त केलेली रक्कम जप्तीत न दाखविता पोलिसांनी हात चलाखी केली. कमी रक्कम जप्तीत दाखविली. या प्रकरणी खुद्द आरोपीनेच पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्याने या प्रकरणाचे बिंग फुटले आहे.
आरोपींकडून हस्तगत केलेली प्रत्यक्ष रक्कम रेकॉर्डवर न दाखवता ठाणेदाराने ती गहाळ केल्याची तक्रार आरोपींनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली. तक्रारीचे स्वरूप गंभीर असून पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी चौकशीकरिता उमरखेडच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे हे प्रकरण सोपविले आहे. त्यांनी कसुरी अहवाल १० दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिले. मात्र, दीड महिना लोटला तरी कोणतीच कारवाई झाली नाही.
१६ जुलै रोजी रात्री येथील ठाणेदारांनी पथकासह तालुक्यातील वाकोडी येथे अशोक गावंडे यांच्या घरात सुरू असलेल्या जुगारावर धाड टाकली. अपराध क्रमांक ३४१/२०२१ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. धाडीत महेंद्र राजाराम अडागळे यांच्या खिशातील १५ हजार आणि सुरेश मारोती खंदारे यांच्या खिशातील १८ हजार, असे एकूण ३३ हजार रुपये जप्त करण्यात आले. परंतु अडागळे यांच्या नावासमोर १२९० आणि खंदारेच्या नावासमोर केवळ २३० रुपये जप्त केल्याचे दाखविण्यात आले. इतरही आरोपींकडून जादा रक्कम जप्त करून ती कमी दाखविली, अशी तक्रार करण्यात आली आहे.
बॉक्स
अनेक आरोपींची नावे वगळली
गावातील अन्य आरोपी प्रत्यक्ष खेळताना आढळून आले. मात्र, त्यांची नावे एफआयआरमध्ये नमूद नाहीत. काहींचे मोबाईल सुपुर्द नाम्याशिवाय परत केले, असेही तक्रारीत नमूद आहे. तक्रारीच्या अनुषंगाने अर्जदार व गैरअर्जदारांचा जबाब नोंदवून कसुरी अहवाल १० दिवसांत सादर करण्याचे निर्देश उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले. मात्र, कसुरी अहवाल देण्यास विलंब होत असल्यामुळे गैरअर्जदाराकडून अर्जदारावर दबाव टाकण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. शिस्तप्रिय जिल्हा पोलीस अधीक्षक या प्रकरणात तत्काळ कारवाई करतील, अशी तालुक्यातील नागरिकांना अपेक्षा आहे.
कोट