ऑनलाईन लोकमत यवतमाळ : शेकडो मैल दूर असलेल्या गावातून एक २८ वर्षीय मुलगी महिनाभरापूर्वी बेपत्ता झाली. या आघाताने ती विमनस्क स्थितीत अकोलाबाजार परिसरात भटकत होती. या मुलीबाबत एका जागृत नागरिकाने वडगाव जंगल पोलिसांना कॉल केला अन् त्या मुलीला तिचे आई-वडील मिळाले.गेल्या काही दिवसांपासून अकोलाबाजार शिवारात एक मुलगी बेवारस फिरताना दिसली. याबाबत प्रवीण मोगरे यांनी वडगाव जंगल पोलीस ठाण्याचे ठाणेदार दिलीप मसराम यांना फोनवरून माहिती दिली. मसराम यांनी मुलीला लगेच पोलीस ठाण्यात आणले. तिची मानसिक स्थिती शांत झाल्यानंतर तिला विश्वासात घेऊन चौकशी केली. त्यात सदर मुलीने तिचे नाव भगवती रामप्यारे साहू असल्याचे सांगितले. ती छत्तीसगड राज्यातील नवगांव, पोलीस ठाणे बलौदा, ज़िल्हा जांजगीर चंपा येथील असल्याचे तिने सांगितले. माहिती मिळताच ठाणेदार दिलीप मसराम यांनी बलौदा पोलीस ठाण्याशी संपर्क करून चौकशी केली. तेथे २० आॅक्टोबरला भगवती हरविल्याची तक्रार तिच्या आई-वडिलांनी दिल्याची नोंद होती.या माहितीवरून तिला शुक्रवारी आई-वडिलांसह छत्तीसगडमध्ये घरी परत पाठविण्यात आले. केवळ एका फोन कॉलमुळे भगवतीला तिचे घर परत मिळाले. यात ठाणेदार मसराम यांनी मोलाची भूमिका निभावली. त्यांच्या सजगतेमुळेच एका मुलीला अगेर आई-वडिलांचे छत्र परत मिळाले. पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर अधीक्षक अमरसिंह जाधव, एसडीपीओ पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनानुसार ठाणेदार दिलीप मसराम, उपनिरीक्षक विजयकुमार घुले, बालाजी ससाणे, होमदेव किनाके, प्रेमदास फुलके, देवराव मरसकोल्हे, मधुकर पवार, राजू तोडसाम, देवराव बन्सोड, नितीन आत्राम, आशिष उईके, नकुल रोडे, विश्वास थूल, संध्या वेलादे यांनी भगवतीला हक्काचे घर मिळवून दिले.
एका कॉलने बेपत्ता मुलीला मिळाले आई-वडील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 1:45 AM
शेकडो मैल दूर असलेल्या गावातून एक २८ वर्षीय मुलगी महिनाभरापूर्वी बेपत्ता झाली. या आघाताने ती विमनस्क स्थितीत अकोलाबाजार परिसरात भटकत होती.
ठळक मुद्देछत्तीसगडची मुलगी : अकोलाबाजार शिवारात भटकंती, वडगाव जंगल पोलिसांची तत्परता