यवतमाळ : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे २४ ऑगस्ट रोजी पुन्हा यवतमाळमध्ये लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी येत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचीही लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गटनोंदणी अंतिम टप्प्यात आहे. दुसरीकडे काँग्रेसमध्येही प्रदेश पातळीवर बैठकांवर बैठका सुरू असून, यवतमाळ लोकसभेची जागा लढण्यासाठी पक्षश्रेष्ठी आग्रही आहेत.
येणाऱ्या काही महिन्यात लोकसभा निवडणुकीचे संकेत असल्याने प्रमुख पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून, २४ ऑगस्ट रोजी ते पुन्हा यवतमाळ येथे येत असून, येथील उत्सव मंगल कार्यालयात विधानसभानिहाय बैठक घेणार आहेत. यवतमाळ, दिग्रस आणि राळेगाव या तीन विधानसभा क्षेत्राचा ते आढावा घेणार असून, या प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून प्रमुख १०० सदस्यांना बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
यवतमाळ येथील बैठकीनंतर वाशिम येथेही अशाच स्वरूपाची बैठक घेण्यात येणार आहे. तेथे वाशिम, कारंजा आणि पुसद विधानसभा क्षेत्राचा आढावा घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेही यवतमाळ लोकसभा निवडणूक लढविण्याच्या अनुषंगाने जोरदार तयारी सुरू केली आहे. या मतदारसंघातील मतदार मागील अनेक वर्षांपासून सातत्याने शिवसेनेच्या पाठीशी राहिलेले आहेत. त्यामुळे शिवसेना मतदारसंघात उमेदवार उतरविणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
निवडणूक तयारीच्या अनुषंगाने पक्षातर्फे गट नोंदणी मोहीम हाती घेण्यात आली होती. या अंतर्गत सुमारे ९० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. विद्यमान खासदार भावना गवळी यांनी शिंदे गटाची सोबत केल्याने या मतदारसंघातून ठाकरे गट नेमके कोणाला मैदानात उतरविणार याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, लोकसभेच्या अनुषंगाने काँग्रेसमध्ये वरिष्ठ पातळीवर बैठका सुरू आहेत. ३ सप्टेंबरपासून पक्षाच्या वतीने पदयात्रा काढण्यात येणार आहे.
या दरम्यान राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघातील निरीक्षकांच्या अहवालावर चर्चा करण्यात येऊन स्वबळावर लढल्यास काय स्थिती राहील आणि आघाडी झाल्यास नेमक्या कोणत्या जागांची मागणी करायची याची रणनीती ठरणार आहे. दरम्यान, काँग्रेसही यवतमाळच्या जागेसाठी आग्रही आहे.